कोथरूड भागातील मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बैठकीत घुसून त्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महापालिका अधिकारी व कर्मचारी आज, गुरुवारी (दि.७) सकाळी काम बंद आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले मात्र अचानक निर्णय बदलण्यात आल्यानंतर सुद्धा पुणे महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत याबाबत गंभीर नाराजी व्यक्त करून वाढत्या राजकीय दबावाला अघोषित संदेश देण्याचे काम करण्यात आले. पुणे महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी एकत्र आले असले तरी सर्वसामान्य पुणेकरांची सेवा सुरळीत राखण्यालाही अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिल्याने या अनोख्या अघोषित आंदोलनाची आज दिवसभर पुणे महापालिकेमध्ये चर्चा सुरू होती. पुणे महापालिकेचे आयुक्त यांच्या कार्यालयात झालेल्या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून महापालिकेसमोर आम्ही एकत्र आलो आहोत.
पुणे महापालिकेत काल मनसे पदाधिकारी व आयुक्त यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे चांगलाच गोंधळ उडाला, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले आणि त्यानंतर मनसे नेते किशोर शिंदे व मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्यात जोरदार वाद झाला. “तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड आहात,” असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांना धारेवर धरल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने काही ठोस निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे महापालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राज असल्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाचा अधिकाऱ्यांवर परिणाम होत नाही. त्यातच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत अघोषित पुकारलेला एल्गार हा पुणे शहरातील सर्वच राजकीय पक्षांसाठी एक संदेश आहे का ही नवी चर्चा महापालिका आवारामध्ये सुरू झाली. पुणे महापालिकेमध्ये प्रशासकराज असल्याने सध्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये फक्त व्यावसायिकांचीच लोक गर्दी करत असून सर्वसामान्य नागरिकांपासून अधिकारी व कर्मचारी दुरावला जात असताना राजकीय पक्षांच्या बाबतही कर्मचारी आणि अधिकारी यांनी टोकाची भूमिका घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता वाढली आहे.
मनसेच्या आंदोलक पोलिसांच्या ताब्यात…
महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसे पदाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या वादावादीनंतर वाद मिटविण्याचे प्रयत्न मनसे नेते बाबू वागसकर यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली परंतु कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे पोलिसांना शेवटी रात्री आठच्या सुमारास शिंदे यांच्यासह मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर व इतर नेते व कार्यकर्त्यांना उचलून बळजबरीने पोलिस व्हॅनमध्ये बसविले. त्यावेळी पोलिसांच्या व्हॅनसमोरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत पोलिसांच्या व्हॅनही रोखण्याचा प्रयत्न केला.