मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान कार्यक्रमात २ विश्वविक्रम ; प्रशस्तीपत्राने सन्मानही

0
38

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपत भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. या महारक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सन्मानित केले. एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील सर्व १२२१ मंडळांमध्ये सर्वाधिक १०८८ रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि सर्वाधिक ७८ हजार ३१३ युनिट्स रक्ताचे संकलन, असे दोन विश्वविक्रम केल्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

प्रदेश भाजपा आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी न्यासाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे वरिष्ठ परीक्षक संजय भोला, वरिष्ठ परिक्षक सीमा मन्नीकोट यांच्या हस्ते श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे, विजय चौधरी, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सह-सचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी एकाच दिवशी झालेल्या महारक्तदान उपक्रमाने दोन जागतिक विक्रम केले ही पक्षासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. सातत्याने समाजासाठी काम करण्याच्या पक्ष संघटनेच्या शिकवणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अव्याहतपणे कार्य करत आहेत. त्यांच्याप्रति आदर आहे. या शिबिरांमुळे सर्वांना सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याची संधी मिळाली त्यामुळे रक्तदात्यांचे आभार,” असे रवींद्र चव्हाण म्हणाले.