नातेसंबंध, मैत्री किंवा सहवेदना या नात्यांमध्ये अनेकदा आपण कोणाच्या तरी मदतीसाठी पुढे येतो. अशीच एक मदत म्हणजे बँक लोनसाठी जामीनदार होणे. परंतु, कोणत्याही नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी बिनधास्त जामीनदार होणे हे धोकादायक ठरू शकते. कारण जामीनदार होण्याचा अर्थ आहे, त्या कर्जाची जबाबदारी तुमच्यावर येणे.
जामीनदार म्हणून तुमचं नाव बँकेच्या दस्तावेजांमध्ये असलं, तर उधारदार व्यक्ती लोन न फेडल्यास बँक तुमच्याकडून पैसे वसूल करू शकते. त्यामुळे, जामीनदार बनण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची क्षमता याचा नीट विचार करणं अत्यावश्यक आहे.
डिफॉल्टर झाल्यास जामीनदारला बसतो फटका
जर कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाच्या हप्त्यांमध्ये चूक करते किंवा थकबाकीदार ठरते, तर बँक थेट जामीनदारकडे नोटीस पाठवते. त्यामुळे जामीनदारचा क्रेडिट स्कोअरही खराब होतो, आणि भविष्यात स्वतःसाठी कर्ज घेणे कठीण होते. इतकंच नव्हे, तर व्याजाचा दरही अधिक लागू शकतो.
बँक कर्ज देताना जामीनदारची क्षमता गृहीत धरून त्याच्या क्रेडिट मर्यादेत त्या कर्जाचा समावेश करते. याचा अर्थ, जामीनदार म्हणून आपण इतर कोणतंही नवीन कर्ज घेताना अडचणीला सामोरे जाऊ शकतो.
दिवाळखोरीतही अडकतो जामीनदार
कर्ज घेणारी व्यक्ती जर दिवाळखोरी घोषित झाली, तर ती कर्जफेडीपासून मुक्त होऊ शकते. पण जामीनदारवर संपूर्ण रकमेची जबाबदारी राहते. आणि ही जबाबदारी फक्त कर्ज संपेपर्यंतच नाही, तर बँकेच्या लेखी परवानगीशिवाय जामीनदार पदावरून मुक्तता होत नाही.
आहेत काही फायदेही
तरीही, जामीनदार होण्याचे काही सकारात्मक पैलू आहेत. उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीसाठी जामीनदार झाल्यास, जर ती वेळेवर कर्ज फेडते, तर तुमचाही क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो. आणि तुमच्या मदतीमुळे तिच्या जीवनातील एखादी गरज पूर्ण होऊ शकते. परंतु यासाठी सावधपणे आणि योग्य माहिती घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्यावी?
- जामीनदार होण्याआधी संबंधित व्यक्तीची नोकरी, उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची तयारी जाणून घ्या
- कर्जाची रक्कम, कालावधी, हप्ते यांची सविस्तर माहिती घ्या
- स्वतःची आर्थिक स्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता तपासा
- कर्जाची कागदपत्रे नीट वाचा आणि शक्य असल्यास वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या
- कर्जाची परतफेड नियमित होत आहे का, हे वेळोवेळी तपासा
जामीनदार होणे हा एक मोठा निर्णय असतो. तो केवळ नात्याच्या आधारावर घेणे शहाणपणाचे नाही. भावनिकदृष्ट्या मदतीचा हात पुढे करणं चांगलं असलं, तरी आपल्या आर्थिक सुरक्षेचा बळी जाणार नाही याची खात्री करून घ्या. अन्यथा, एका चुकीच्या निर्णयामुळे भविष्यातील तुमचे स्वप्न देखील धूसर होऊ शकते.