राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या दोन आमदारांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कारवाई केलीय. प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात दोन्हीही आमदारांना पत्र पाठवलं असून एक आमदार मंत्रीसुद्धा आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोन्ही आमदारांना प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा देण्यास सांगितलंय. पण त्याला नकार देत हे दोन्हीही आमदार आमचे नेते फक्त शरद पवार असल्याचं म्हणतायत.






दोन्ही आमदार केरळचे असून ए.के. ससींद्रन आणि थॉमस के थॉमस अशी त्यांची नावं आहेत. सध्या ते शरद पवार गटात असले तरी २०२१ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक जिंकलेत. केरळचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष असणारे थॉमस के थॉमस आणि ए. के. ससींद्रन हे एलडीएफसोबत सत्तेत आहेत. हे दोन्ही आमदार पक्षविरोधी कारवाया करत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रात म्हटलंय.
प्रफुल्ल पटेल यांनी थॉमस के थॉमस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलंय. तर एक आठवड्यात पदाचा राजीनामा देण्यास सांगितलंय. जर राजीनामा दिला नाही तर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या तरतुदी आधारे अपात्र करण्याच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारासुद्धा पत्रातून देण्यात आलाय. प्रफुल्ल पटेल यांनी दोन आठवड्यापूर्वीच यासंदर्भात पत्र लिहून दोन्ही आमदारांना कळवलं होतं.
केरळचे वनमंत्री असणाऱ्या ए.के ससींद्रन यांनाही असंच पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलंय. यानंतर थॉमस यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचं केरळ युनिट हे शरद पवारांना नेता मानतं. तेच आमचे नेते आहेत आणि त्यांना नेते मानूनच आम्ही काम करतोय. त्यामुळे या पत्राकडं आम्ही दुर्लक्ष करतोय. आमचा प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षाशी संबंध नाही.
पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कारवाईच्या इशाऱ्याबाबत थॉमस यांनी सांगितलं की, आता याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. केरळ युनिट प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलेल्या पत्राचा विचार करणार नाही. आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करतोय आणि करत राहू.











