मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; “राजधर्माचे पालन…संयम बाळगणे गरजेचे”

0

नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला आहे. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

“जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे”, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!

लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही मुलाखत घेतली. जयंत पाटील यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारत असताना राजकीय परिस्थितीवरून चिमटेही काढले. त्याला फडणवीस यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी सरकार मधील काही मंत्री बेजबाबदार विधाने करत असल्याचा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता.

जयंत पाटील यांचा रोख नितेश राणे यांच्याकडे होता. मात्र त्यांनी कोणत्याही मंत्र्यांचे नाव न घेता प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो. त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असा सल्ला त्यांना देतो.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री

दरम्यान बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमधील लाडका मंत्री आहे. त्यामुळे कोणाला चिंता करण्याची गरज नाही.

दरम्यान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणात एक आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानावर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे म्हटले. या विधानानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू सावरून धरली होती. तसेच मंत्रीपदावर असताना विचारपूर्वक आणि संयम बाळगून विधान करायला हवे, असे ते म्हणाले होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन