कसबा पेठेत एका म्यानात दोन तलवारी प्रवेश करताच धंगेकरांचा आमदार रासनेंवर प्रहार, थेट या मुद्यावरुन छेडले

0

गेल्या काही वर्षांपासून कसबा विधानसभा मतदार संघ चर्चेत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘हु इज धंगेकर’ हा मुद्दा चर्चेत आला होता. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे हे वाक्य काँग्रेसने निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्या पोटनिवडणुकीत भाजप उमदेवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर निवडून आले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. काँग्रेसमध्ये असलेले रवींद्र धंगेकर महायुतीमधील शिवसेनेत मागील आठवड्यात आले. भाजप आणि शिवसेना महायुतीत कसबा पेठेत एका म्यानात दोन तलवारी झाल्या. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी थेट आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

महायुतीमधील वाद तीव्र

कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे पहायला मिळत आहे. कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसल्यावरुन त्यांनी लक्ष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत असलेले जुने वाद मिटण्याऐवजी तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे.

काय आहे बॅनरवर

माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी बॅनरवर लिहिले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघात या आशयाचे फ्लेक्स लावले आहे. ते आता महायुतीतील मित्र पक्षात आहे. मात्र विद्यमान आमदार हेमंत रासने यांना धंगेकर लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पुण्यात महायुतीमधील तिन्ही पक्षात म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वर्चस्वाची लढाई वाढणार आहे.

रवींद्र धंगेकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यानंतर त्यांचे महायुतीमधील घटकपक्ष भाजपसोबत मतभेद कायम असल्याचे संदेश जात आहे. आता हे वाद मिटतील का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.