स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी : भाजपकडून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी विविध समित्यांवर संधी

0

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्त्यांची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, सत्तेत असलेल्या भाजपकडून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी विविध समित्यांवर नियुक्ती दिली जात आहे, याच अनुषंगाने भोकरदन-जाफराबादचे आमदार संतोष दानवे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण कार्यकारी समिती व रुग्णकल्याण नियामक समितीच्या सदस्यपदी कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण कार्यकारी समिती व रुग्णकल्याण नियामक समितीच्या सदस्यपदी शहरातील भाजप कार्यकर्ते गजानन लहाने, शेख कौसर व अनिल वरगणे यांची निवड केली आहे, तर टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयातील समितीवर शालिकराव मस्के, सुरेश सोळुंके व मनोज पंडित यांची निवड झाली आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

ग्रामीण भागामध्ये विविध अशासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्यास कार्यकर्त्यांना उभारी मिळते. त्याच अनुषंगाने आमदार संतोष दानवे यांनी सद्यःस्थितीत रुग्णकल्याण समितीच्या सदस्यपदी पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. दरम्यान, यामुळे कार्यकर्त्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

आपल्याला एखाद्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती मिळेल, या आशेवर अनेक कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामास लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. याच माध्यमातून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम या माध्यमातून होताना दिसत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

ग्रामीण रुग्णालयाची समिती स्थापन होऊन त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडी झाल्या आहेत. दरम्यान, आणखी विविध प्रशासकीय समित्यांवर आपली वर्णी लागेल, ही अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. संजय गांधी निराधार समिती, सार्वजनिक वितरण दक्षता समिती, रोजगार हमी समिती, शांतता समिती, तालुका तक्रार निवारण समिती, जलयुक्त शिवार अभियान समिती, एकात्मिक विकास पुनर्विलोकांन समिती या समित्यांसह अन्य समित्यांवर वर्णी लागण्याच्या अपेक्षेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पद

स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या शासकीय प्रशासकीय समित्यांवर जनतेची कामे सुरळीत व्हावी, म्हणून नियुक्ती दिले जाते. विशेषतः सार्वजनिक वितरणासाठी असलेली दक्षता समिती, निराधारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी असलेली संजय गांधी निराधार योजना समितीवर निवड होण्यासाठी अनेकांची इच्छा असते. दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना पदे बहाल केली जातील, असा सूर कार्यकर्त्यांतून निघत आहे.