मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ मध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली असून पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवर असून, त्याखालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा क्रमांक आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या दोन कोटी ४७ लाख महिलांपैकी सुमारे पाच लाख महिला या विविध कारणांमुळे या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरत आहेत. या अपात्र ठरलेल्या अनेक महिला आता पैसे परत करत आहेत. पुण्यातून जवळपास ७५ हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिलांनी पैसे परत केलेले पैसे शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून या महिलांनी सरकारी बँकेत जाऊन या लेखाशीर्षच्या खात्यामध्ये एका चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.






ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, अशा महिला या योजनेतून अपात्र ठरत आहेत. या अपात्र ठरलेल्या अनेक महिलांनी स्वेच्छेने पैसे परत करण्यात सुरुवात केली आहे.
अपात्र बहिणी
वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या एक लाख १० हजार
‘नमो शक्ती’ चा लाभ घेणाऱ्या, चारचाकी वाहन तसेच स्वेच्छेने पैसे परत करणाऱ्या एक लाख ६० हजार
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या २ लाख ३० हजार
राज्य सरकारने २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे. सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
– आदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री












