महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आजवर त्यांनी अनेक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. अशातच त्यांनी बंजारा समाजासाठी खास गाणं तयार केलं आहे. हे गाणं काही तासांपूर्वीच यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे.
अमृता फडणवीस त्यांच्या गायनामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. नुकतंच त्यांनी श्री संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजासाठी हे गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “#मी पुन्हा येत आहे…आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी…संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक गीत घेऊन…संपर्कात रहा.”
अमृता फडणवीस यांना आधीपासूनच गायनाची आवड आहे. ही आवड जपत त्यांनी अनेक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. दरम्यान, त्यांच्या गाण्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. अनेकदा त्यांना प्रोत्साहन दिले जाते, त्यांच्या गाण्यांचं कौतुकही केलं जातं. पण दुसरीकडे अनेकदा त्यांच्यावर टीकाही केली जाते. त्यांचं हे नवं गाणं बंजारा समाजासाठी तयार करण्यात आलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अमृता यांचे आभार मानले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “अप्रतिम गायन व सादरीकरण, आपली बंजारा समाजाबद्दल आपुलकी आपल्या गायनातून दिसते. धन्यवाद मॅम. जय सेवालाल.” तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “फडणवीस मॅडम तुमचे खूप खूप आभार, बंजारा समाजाशी तुमचं जवळचं नातं आहे आणि आमचा समाज हे गाणं कधी विसरणार नाही. खूप खूप धन्यवाद. जय सेवालाल.” या गाण्याला तीन तासांमध्येच ६५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.