प्रगती यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी गोपालगंजमध्ये पोहचलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांनी त्यांच्या पुन्हा एडीएला सोडचिठ्ठी देणार असल्याबाबतच्या सुरू चर्चांवर मौन सोडले. नितीश कुमार म्हणाले, आम्ही दोनदा चुकून इकडेतिकडे गेलो होतो. आता नेहमीच सोबत राहू आणि बिहारसोबतच देशाचा विकास करू. असे म्हणत नितीश कुमार यांनी राजकीय वर्तुळात त्यांच्याबाबत सुरू असणाऱ्या उलटसुलट चर्चांना एकप्रकारे पूर्ण विरामच दिला.






नितीश कुमार म्हणाले, आधी हिंदू-मुस्लीम यांच्यातील वादाच्या बातम्या येत होत्या. मात्र जेव्हापासून बिहारच्या जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली, तेव्हापासून बिहारची परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाचे काम सुरू आहे. कोणासोबतही भेदभाव केला जात नाही. आम्ही मिळून बिहारला पुढे नेत आहोत.
बिहारचा कोणताही भाग विकासापासून दूर नाही. आम्ही शिक्षण, आरोग्य, रस्ते, पूल निर्माणाचे मोठ्याप्रमाणावर काम केले आहे. ज्यामुळे बिहारमधील कोणत्याही कोपऱ्यातून लोक पाटणाला सहा तासांत पोहचत होता. आता हा कालावधी कमी होवून पाच तासांवर आला आहे. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय नितीश कुमारांनी सांगितले की, वर्ष 2020मध्ये आम्ही आठ लाख जणांना सरकारी नोकरी दिली. त्यानंतर आम्ही दहा लाख जणांना सरकारी नोकरी देण्याचे लक्ष्य ठेवले होते, जे वाढवून 12 लाख केले आहे. आतापर्यंत 9 लाख जणांना सरकारी नोकरी दिली गेली आहे. याशिवाय दहा लाख लोकांना रोजगार देण्याचेही उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. आतापर्यंत 54 लाख जणांना रोजगार दिला गेला आहे. वर्ष 2025 मध्ये 12 लाख जणांना सरकारी नोकरी आणि 34 लाख जणांना रोजगार उपलब्ध केला जाईल.
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयी केलेले विधान आणि नितीशबाबूंचा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबतचा एक फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आले होते. नितीश कुमार पुन्हा लालूंसोबत हातमिळवणी करणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते.













