महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.






अशातच भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, यांच मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहे का? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. त्यामागील कारण म्हणजे नागपुरात उपस्थीत असून देखील मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गैरहजर असल्याने अनेक चर्चेला उधाण आले असताना स्वत:सुधीर मुनगंटीवार पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टोक्ती देत भाष्य केलं आहे.
पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही
सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असे स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असल्याचे बोलले जात आहे.
सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सत्रात विरोधी पक्षातील सदस्यांना माझे आवाहन आहे त्यांनी पाहिजे ती चर्चा करावी, सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. 35 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत, त्या मंजूर होतील. आपला अर्थ संकल्प मोठा आहे, जेव्हा पासून डिजिटल सिस्टीम सुरू केली तेव्हापासून अजून मागण्या वाढल्या आहेत. तसेच योग्य चर्चा करून त्या मंजूर करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसीबद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही. त्यांनी इतक्या वर्षात केवळ अन्याय केला. महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी 48 जीआर आम्ही काढले, ओबीसी मंत्रालय स्थापन केले, रोजगाराची व्यवस्था, पी एच डीची व्यवस्था आम्ही केली, तर काँग्रेसला दाखवण्यासारखे काही काम नाही. इतक्या वर्षानंतर ओबीसी समाजाला सांविधानिक दर्जा मोदी साहेबांनी दिली. सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात बघायला मिळतात. काँग्रेसमध्ये पटोले आणि वडेट्टीवार यांच्यावर अन्याय होतो, तो आमच्यावर काढतात.असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.











