हिंदुत्ववादी कोथरूडला ‘सांताक्लॉजी’ वृत्ती जोमात; ‘इव्हेंट’कंपनीच्या जोरावर स्व-पक्षीय आमदाराच्या विरोधातच दंड थोपटले 

• चंद्रकांत पाटलांना पुणेकरांनी स्विकारले की नाही स्पष्ट करणारी निवडणुक • निवडून आल्यापासून फक्त आणि फक्त 'दान-वे' हाच मार्ग •....जी प्रवृत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनपेक्षित नाही ज्यामुळेच कोथरूडचा उमेदवार बदलाची चर्चा

0
2

पुण्यातील कोथरूड विधानसभा म्हटलं की एकच नाव येतं आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला! पण गेली 4 वर्ष पाहिजे ते फुकट आणि तेही दारात अन् वाजत गाजत! अशी संघाला अनपेक्षित प्रवृत्तीला सध्या कोथरूड भागामध्ये पेव फुटले आहे. गेली चार वर्ष विद्यमान आमदार आणि काही दबंग(गावकरी) नगरसेवक यामध्ये अग्रेसर होते; परंतु पुणे महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुका कोथरूड भागामध्ये विद्यमान आमदारांसाठी डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत. वाटपशास्त्र अंगीकृत केलेले दबंग(गावकरी) नगरसेवक सध्या आमदारकी मिळवण्यासाठी इच्छुक झाल्याने विधानसभेसाठी भाजपमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. गेली 4 वर्ष विद्यमान आमदार ज्या पद्धतीने नागरिकांशी ‘वाटपशास्त्र’ वापरत आहेत त्याचीच पुनरावृत्ती करत भाजपचे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि नगरसेवक अमोल बालवडकर यांनी इव्हेंट कंपनीच्या भरवशावर कोथरूड विधानसभेत शड्डू ठोकत थेट उमेदवारी मिळविण्याचा दावा केला आहे. मुळात जी प्रवृत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित नाही आणि ज्यामुळेच कोथरूड विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलाची चर्चा जोरदार सुरू झालेली असतानाच बालवडकर यांनी ‘इव्हेंट’कंपनीच्या भरोश्याने दावा केल्याने कोथरूडमध्ये ‘सांताक्लॉजी’वृत्ती जोमात असून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची ‘आत्मसंतुष्टी’ मात्र उमेदवारांना नक्कीच मिळत आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

भाजप पक्ष हा कायम मेरीटच्या आधारावर उमेदवारी देत असतो. मी भाजपमधून इच्छुक असून भाजप माझा नक्की विचार करेल अन् विचार न केल्यास योग्य तो निर्णयही घेईल असे म्हणत अमोल बालवडकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले असले तरी नुकत्याच भाजपवाशी झालेल्या आणि निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मतावर निवडून आल्यापासून फक्त आणि फक्त ‘दान-वे’ हाच मार्ग अवलंबविलेल्या या नवख्या उमेदवाराच्या पदरी काय पडणार हा प्रश्न मतदारसंघात चर्चिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कायमच कोथरूड विधानसभा मतदारसंघावर व्यक्तिगत लक्ष असते. पुणे शहरातील सर्वाधिक नित्य-शाखाही याच मतदारसंघात भरवल्या जात कोणालाही संधी देताना उपद्रव मूल्य आणि संघ-आयु या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने २०१९ साली चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आणि विजयी सुद्धा केले. उमेदवारी बदलाचे पडसाद संपुर्ण मतदारसंघात असतानाही २५,४९५ मतांनी विद्यमान आमदार निवडून आले. पुढील पाच वर्षे वारेमाप आणि वाटेल ते वाटप करत चंद्रकांत पाटलांनी कोथरूडकरांची मनं जिंकलीत अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. यातच कोथरूडमधून इच्छूक असलेल्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा तर मुरलीधर मोहोळांना संसदेत केंद्रीय मंत्रिपदी संधी मिळालीय. त्यामुळे कोथरूडमध्ये भाजपला चंद्रकांत पाटलांशिवाय पर्याय दिसत नसल्यानं महायुतीत त्यांची उमेदवारी फिक्स मानली जातेय. चंद्रकांत पाटील २०२४च्या निवडणुकीला सामोरं जावं जात असतानाच स्व-पक्षातील नगरसेवकाने केलेले बंड आणि प्रादेशिक समतोलाचा विचार करता हक्काच्या बालेकिल्लात होणारी बंडखोरी ही कदाचित डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

दुसऱ्या बाजूला मविआकडून ठाकरे गटाने कोथरूडवर आपला दावा सांगितलाय ठाकरे गटाचे पृथ्वीराज सुतार यांनी निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनीही दंड थोपाटले आहेत. पृथ्वीराज सुतार यांचे वडील शंशिकात सुतार हे १९९० आणि १९९५ च्या पूर्वीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून आले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास २००८ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन ‘कोथरूड’ विधानसभा मतदारसंघ तयार झालाय. त्यानंतरच्या २००९ साली पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनी बाजी मारली. २०१४ साली भाजप आणि शिवसेना आमनेसामने लढतीत भाजपकडून मेधा कुलकर्णी यांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी विजय मिळवत मतदारसंघ ताब्यात ठेवला. यातच ते पुण्यात कायमचे स्थायिकही झाले आहेत, मात्र तरीही या निवडणुकीत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार शिवसेना आणि मनसेकडून केला जाण्याची शक्यताही आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना पुणेकरांनी स्विकारले की नाही, हे स्पष्ट करणारी ही निवडणुक असणार आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा