एसटी कामगार सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केला आहे. तसेच बेहिशेबी कर्ज दिले आहे, असे आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी एसटी कामगारांनी केली. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर एसटी कामगार संघटनेकडून आंदोलन करत सदावर्ते दाम्पत्याला अटक करण्याची मागणी केली.






संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरणात सदावर्ते यांना अटक करा, 150 कर्मचाऱ्यांची भरती करत त्यामध्ये लाखो रुपये लाटल्याचा आरोप देखील आंदोनकर्त्यांनी केला. तसेच विविध मागण्यांची निवेदन सहकार आयुक्तांना एस कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
सदावर्तेंनी बँकेचे वाटोळे केले
एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले, सदावर्तेनी एसटी कामगार सहकारी बँकेचे वाटोळे केले आहे. कामगार भरतीमध्ये तसेच संगणक खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांना अटक व्हावी, अशी आम्ही मागणी केली आहे.
संघटना एकवटल्या
संदीप शिंदे यांनी सांगितले की, एसटी कामगारांच्या वेतन राज्य सरकारकडे प्रमाणे असावे ही विनंती आम्ही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. एसटीच्या आठ ते नऊ संघटना यासाठी एकत्र आल्या आहेत. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करणार आहोत.
...तर पंढपूरला जाणार
मुख्यमंत्री आषाढीच्या पुजेसाठी पंढपुरला जाणार आहेत. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये असे आमचे मत आहे. मात्र, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही देखील झेंडे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पंढपुरला जाऊ, असा इशारा एसटी कामागार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.










