मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेपाटील यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह काहीजण थेट भूमिका घेऊन जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोधही करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत विखे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर, दुसरीकडे कधीकाळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातील डॉ. रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. तारक यांना काळे फासतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचं दिसून येत आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. जरांगे यांच्या मागणीवर सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते. आता, दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पण, या उपोषणाची झळ सामाजिक सलोखा बिघडवण्यात बसत असल्याचं दिसून येत आहे. कारण, जरांगे यांच्या उपोषणास विरोध केल्यामुळे त्यांच्याच जुन्या सहकाऱ्याला काळं फासण्यात आलं आहे.
पेशंट बनून आले, काळं फासलं
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणारे पत्र मी 2 महिन्यांपूर्वी दिले होते, 2 महिन्यांनी ही घटना घडली आहे. आज सकाळी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले. तसेच, वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हटले, पण त्यांना माझा वाढदिवस आज नाही, असे सांगितल्यानंतरही त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर, चेहऱ्याला काळ फासलं आहे, यामागे कोण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. तारक यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिले होते निवेदन
मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी डॉ. रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. अंतरवाली सराटमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याने हे काळं फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. तारक यांनी जरांगेंच्या उपोषणाला आंतरवाली परवानगी देऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहले होते. तसेच, ग्रामस्थांच्या सह्या घेऊन या मागणीचे निवेदनही जालन्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावातच आपलं उपोषण केलं. आता, त्याच विरोधाचा राग धरुन, झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश तारक यांच्या चेहऱ्यावर काळी शाई ओतून चेहऱ्याला काळं फासलं.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण गढूळ बनत असून दोन्ही समाजातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन करणे आवश्यक असल्याची अपेक्षा काही जाणकरांकडून करण्यात येत आहे.
…….
मुख्यमंत्री भंडारा दौऱ्यात मीडिया टीमची बोट बुडाली;
वैनगंगा नदीत बोट एका खडकावर तीन तुकडेची दुर्घटना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील अधिक तपशील समजू शकलेला नाही. या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याच वेळी हा अपघात घडला आहे. या भंडारा दौऱ्या दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट एका खडकावर आपटून तिचे तीन तुकडे झाल्याची घटना घडली आहे.
वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. येथील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार असून भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या स्वागताचे भंडारा जिल्ह्यात जागोजागी होर्डिंग लावण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने रोजगारात वाढ होणार आहे.
काय आहे प्रकल्प
वैनगंगा नदीच्या पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर हा जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्पा साकारला जात आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच या प्रकल्पाची उभारणी होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 10 हजाराहून अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. या प्रकल्पासाठी 102 कोटींचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.
……..
मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी अपडेट; फॉर्म्युला ठरला? चर्चा झाली नाही पण दोन दिवसातच घोषणा : संजय शिरसाट
लोकसभा निवडणूक संपल्यापासूनच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक हिंट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय. मंत्रिमंडळाच्या फॉरम्युल्यावर चर्चा झाली नाही. आज किंवा उद्या याबाबतची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे, असं संजय शिरसाट यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
“संजय राऊत जज आहेत का?”
अडीज वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही आपल्या पोलीसांवर अविश्वास दाखवून ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहेत. यातून पैसा आणि सत्ता हे बोलणं योग्य नाही. जे यावर टीका करतात ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत. संजय राऊत यांना आता आठवलं वाटतं… मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत की नाहीत हे ठरवणारा तू कोण? तू जज आहेस का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हणत संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटावर निशाणा
देशात लोकशाही आहे. पैश्याचे सत्ता आली असती अंबानी- अदानी पंतप्रधान झाले असते. कल्पना लढवून, भाषा वापरून टिका करून काही होत नाही. सकाळचा भोंगा यालाच बांबू लावला पाहिजे. भोंगा वाढला की 10 वाजले असं समजतं. तुमचं तुम्ही वाकून पाहा. तुम्हाला शरद पवारांनी बांबू घातला. काँग्रेस म्हणतात की तुम्ही याच बांबू घालू… तुमच्यात किती बांबू लागले ते पाहा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्या सल्ल्याची गरज नाही… बांबू ठाकरे गटाला लागलाय…, असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
विधानसभेत आम्हीच यांना बांबू लावू… कमरेखालचं बोलायची संजय राऊत याला सवय लागली आहे. आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आगीत तेल टाकण्याचं काम नाना पटोले करत आहेत. मी हात जोडून विनंती करत दोन्ही समाजांच्या नेत्यांना की सरकार आरक्षणा प्रश्ना गंभीर आहे. दोन समाजात तणाव वाढतोय. आपण याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा राज्य पेटलं तर भयंकर प्रकार होईल, असं म्हणत संजय शिरसाट यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.