विनोद तावडे यांच यामुळं संपूर्ण बैठकीत मौनच! लोकसभा अपयश सामूहिकच; विकेंद्रीकरण करा: केंद्रीय समिती

0

‘लोकसभा निवडणुकीत जे झाले, तो भूतकाळ आहे. लोकसभेतील अपयशाची जबाबदारी सामुदायिक आहे. त्यासाठी एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात अर्थ नाही’, असे सांगत भाजप केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवताना महायुतीच्या नेत्यांबरोबरच पक्षातील नेत्यांशीही संवाद ठेवा; सारे काही मीच करणार, अशी भूमिका न घेता पक्षाच्या नेत्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा, असे सांगत केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांचे कानही टोचले आहेत.

मतदारांनी दिलेला कौल आता भूतकाळ

दिल्लीत मंगळवारी विधानसभेसाठी राज्य सुकाणू समितीची बैठक पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नक्की काय झाले, याची माहिती हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत लोकसभेतील पराभवाची झाडाझडती तर घेतली गेलीच. पण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मतदारांनी जो कौल दिला तो भूतकाळ झाला. आता आगामी विधानसभा जिंकण्याचेच आपले लक्ष्य आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या जातील, हे पक्षनेतृत्वाने स्पष्ट केले. मात्र, हे करतानाच तुम्हाला केंद्राकडून संपूर्ण पाठबळ आहे म्हणून, एकला चलो रे, अशी भूमिका घेऊ नका, असेही केंद्रीय नेतृत्वाने बजावल्याचे समजते.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

तावडेंना बिहार सांभाळण्याचा सल्ला

राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी असलेल्या विनोद तावडे यांनाही या बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांना त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या बिहार या राज्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर तावडे यांनी संपूर्ण बैठकीत मौन बाळगणेच पसंत केल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षनेत्य़ांत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या वाटून द्या आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करू द्या, पंकजा मुंडे यांच्याकडे एकदा बीड, परळी दिले की, त्यांच्यावर ती जबाबदारी असेल. तुम्ही त्यांच्या कामात अकारण हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असेही केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याचे समजते.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला

भाजपने लोकसभा निवडणुका या नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे, या एकाच राजकीय कथनाने (नॅरेटिव्ह) पुढे नेण्याचे ठरवले होते. मात्र, महाराष्ट्रामध्ये समाजमाध्यमे व इतर माध्यमांतून तसे घडले नाही. त्यामुळे पक्षाच्या जागा २३ वरून ९ वर आल्या, याकडे भाजप पक्षनेतृत्वाने लक्ष वेधले. विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला उघडे पाडण्यात राज्य नेतृत्व का अपयशी ठरले, दिंडोरीतील पंतप्रधानांच्या भरसभेत संतप्त तरुण कसे पुढे आले, याचे आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला राज्यातील नेत्यांना बैठकीत दिला गेल्याचे समजते.