एकतर रखरखते ऊन, त्यात राजकीय सभा, मेळाव्यांना या म्हणून राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांचा आग्रह. अगदी पैसे, जेवण, येण्या-जाण्याची व्यवस्था करूनही कोणी सभेला येण्यास तयार होत नसल्याने मुंबई, दिल्लीहून आलेल्या वरिष्ठ नेत्यांसमोर शक्ती प्रदर्शन करावे तर कसे, असा प्रश्न सगळ्याच पक्षांना पडला आहे. चैत्र नक्षत्राच्या उन्हाच्या चटक्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून सभा, कॉर्नर बैठका, संवाद यात्रा सुरू आहेत. प्रत्येक नेता सभेला माणसं अधिक जमवावे लागतील, खुर्च्या रिकाम्या राहता कामा नये, अशी तंबी गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली जात आहे. तरी सभांना गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्त्यांना बराच घाम गाळावा लागत आहे.






शहरातील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अथवा मनसे, रिपाई यासह महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, कवाडे गटाची महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचा घाट वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घातल्यामुळे कधी गावात एकमेकांचे तोंड न पाहणारे कार्यकर्तेही गळ्यात गळे घालून फिरत असल्याचे चित्र आहे.
स्वप्नात न पाहिलेले राज्यपातळीवरील समीकरण, नेत्यांच्या तडजोडी आणि यातून समोर आलेली परिस्थिती कार्यकर्त्यांना गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपलेच ध्येय धोरण समजावून सांगताना कस लागत आहे. अनेक दिग्गज नेते या पक्षातून त्या पक्षात गेल्याने कोणत्या तोंडाने लोकांसमोर जावे असे स्वतःच्या मनाला वाटत असतानाही जो-तो आपल्या पक्षाचा प्रचार रेटून नेत आहे. मात्र, खरी गोची कार्यकर्त्यांची झाली असून कार्यकर्ता हा रक्त वाहिनीसारखा जिवंत असला तरच पक्ष गावपातळीवर पोहचतो आणि त्याचा फायदा निवडणुकीत त्या-त्या पक्षाला होत असतो. दोन्ही पक्षाकडून महिलांचे, समाज बांधवांचे, तरुणांचे मेळावे घेत महत्व देण्यात आले आहे. छोट्या-मोठ्या मेळाव्यांना गर्दी जमत असली तरी खरा महत्वाचा प्रश्न आहे मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांना गर्दी जमवण्याचा.
उन्हाचा पारा चढलेला असल्याने मराठवाड्यात प्रचंड उकाडा आहे. एकाच दिवसात अधिकाधिक सभा घेण्याचा नेत्यांचा आग्रह असल्यामुळे अगदी भर उन्हात सभा घेतल्या जात आहेत. सहाजिकच याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसत आहे. त्यामुळे सोशल मिडियाचा अधिकाधिक वापर करत गावपातळीवर आपलाच पक्ष, नेता, उमेदवार कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले जात आहे.
एखाद्या सभेला गर्दी नाही जमल्यास रिकाम्या खुर्च्या प्रचारात मत परिवर्तन करण्यास कारणीभूत ठरू शकतात. म्हणून प्रत्येक नेता सभांना गर्दी कशी जमेल याचाच विचार प्रामुख्याने करत आहेत. काहीही करा फक्त गर्दी जमवा, असा आदेशच ते पदाधिकारी, कार्यकर्तांना देत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून सभांना माणसं घेऊन जाण्यासाठी नेत्यांकडून अत्याधुनिक प्रकारच्या गाड्या कार्यकर्त्यांच्या व मतदाराच्या दारात उभ्या केल्या जात आहेत.
मात्र, तुमच्या नेत्यांनी असे का केले, तुम्ही कोणत्या तोंडाने मतदान मागताय, पाच वर्षे काय काम केले, यापुढे कसा विकास करणार, पाच वर्षे काय विकास केला? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मतदार करताना दिसत आहेत. या सभेला विक्रमी गर्दी जमवण्यासाठी व शक्ती प्रदर्शन करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पुणे येथे सभा होत असल्याने शहरातूनच सर्वाधिक लोक कसे जमतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. चैत्राच्या उन्हात नेते व उमेदवार प्रचाराच्या घाईत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.












