‘म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून…’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

0

लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान नेत्यांकडून पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात असून, आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा म्हातारा असा उल्लेख केला आहे. म्हातारा लय खडूस आहे अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना देत नाहीत असंही यावेळी ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

“ही लढाई खऱ्या अर्थाने वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक चर्चा आहेत. काय तर म्हणे साहेबांचं वय 84 म्हणून ते 84 सभा घेणार अशा चर्चा सुरू आहेत. आता साहेबाला काय काम आहे? त्यांना म्हसरं राखायची आहेत? की जनावारांना पाणी पाजायचं आहे? तोच धंदाच करायचा आहे. पण त्यांना मानलं पाहिजे. या वयातही ते आमच्या सारख्यांना संधी देत नाहीत,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

“बाप मुलगा कर्तबगार झाला की त्याच्या हातात प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडत आहे. अजित पवार किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवरांच्या लक्षात आलं की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतंय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. कारण आता हे बास झालं आता आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच म्हातारा झाल्यावर करायचा का? म्हणून अजितपवार मोठ्या ताकजीने विकासासाठी महायुतीमध्ये आले,” असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

याआधी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला असं विधान केलं होतं. “70 वर्षांपासून महाराष्ट्रात मूठभर सरदारांचं राज्य होतं. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळेच शरद पवारांसारख्या नेत्याला त्यांची जात काढावी लागते. पण पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं आडनाव फडणवीस असतं तर महाराष्ट्रात तुम्हाला कुणी हुंगलंही नसतं. मात्र देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवारांना खोटं बोलत रेटून चालावं लागतं आहे,” असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन