आज दिल्ली अन् हैद्राबाद मधे होणार लढत! प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या मैदानावर खेळणार पंत

0

फिरोजशाह कोटला या आपल्या घरच्या मैदानावर प्रदीर्घ कालावधीनंतर आज प्रथमच खेळणाऱ्या रिषभ पंतसाठी हे पुनरागमन भावनिक असणार आहे; पण दुसऱ्या बाजूला तेवढाच सक्षम आणि कठोर विचार करून झंझावाती सनरायझर्स हैदराबाद संघाला रोखावे लागणार आहे.

कार अपघातानंतर जवळपास दीड वर्षानंतर पुनरागमन करणारा रिषभ पंत गतवर्षी कोटला मैदानावर केवळ कुबड्या घेऊन संघाचे मनोबल वाढवण्यासाठी आला होता. अथक परिश्रम आणि तंदुरुस्ती मिळवून आता तो पुन्हा दिल्ली संघाचे कर्णधारपद भुषवत आहे.

दिल्ली कॅपिटल संघासाठी हा आयपीएल मोसम संमिश्र राहिला आहे. लखनौ आणि गुजरात या संघांवर दणदणीत विजय मिळवले असले, तरी सातपैकी चार सामन्यांत पराभवाची चवही चाखावी लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला विश्वविजेत्या पॅट कमिम्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबाद संघ वेगळाच उंचीचा खेळ करत आहे. दोन सामन्यांत त्यांनी ३/२७७ आणि ३/२८७ अशी आयपीएलमधील विश्वविक्रमी धावसंख्या उभारलेली आहे. त्यामुळे पंत आणि त्याच्या दिल्लीसमोर आजच्या लढतीत आव्हान डोंगराएवढे असणार आहे.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

हैदराबाद संघाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (२३५) याने ३९ चेंडूत शतक केलेले आहे. त्याचा साथीदार अभिषेक शर्मा (२११) हासुद्धा तेवढीच आक्रमक फलंदाजी करत आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये त्यांची पॉवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची हवाच काढत आहे. या दोघांचा स्ट्राईक रेट अनुक्रमे १९९ आणि १९७ असा आहे. त्यांच्यासमोर ईशांत शर्मा, खलिल अहमद आणि मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाज कसा मारा करतात, यावर दिल्ली संघाचे भवितव्य असणार आहे.

हेड आणि अभिषक यांच्यानंतर फलंदाजीस हेन्रिक क्लासेन फलंदाजीस येतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होत आहे. सर्वोत्तम फिनिशर्स अशी ओळख असलेल्या क्लासेनकडे स्टेडियमच्या बाहेर षटकार मारण्याची क्षमता आहे.

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!

हैदराबादच्या या झंझावाती फलंदाजांना रोखण्यासाठी दिल्लीकडे चायनामन कुलदीप यादव (६.०६ इकॉनॉमी) हे अस्त्र आहे. पंतकडे कुलदीपसह त्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल हे आणखी दोन फिरकी गोलंदाज आहे; परंतु त्यांचाही कस लागू शकतो.

दिल्ली संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसत आहे. मिचेल मार्श अगोदर स्पर्धेतून बाहेर गेला आहे. आता डेव्हिड वॉर्नरलाही दुखापत झाली आहे; परंतु संधी मिळालेल्या जॅक फ्रेसरने दोन सामन्यातून कमालीची क्षमता दाखवली आहे; तरीही पंतला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करून संघाला आधार द्यावा लागणार आहे.

सहापैकी चार सामन्यांत विजय मिळवणाऱ्या हैदराबादसाठी त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजीची बाजू सांभाळत आहे. तो ७.८७ च्या सरासरीनेच धावा देत आहे. शिवाय मोक्याच्या क्षणी विकेटही मिळवत आहे; मात्र जयदेव उनाटकट (११.३५ सरासरी), भुवनेश्वर कुमार (१०.४५), मयांक मार्कंडे (११.२३) आणि शाहबाझ अहमद (१२.४४) यांच्याकडून अपेक्षेपेक्षा अधिक धावा दिल्या आहेत म्हणून २७७ आणि २८७ धावा उभारूनही हैदराबादला मोठे विजय मिळवता आलेले नाही. पहिल्या वेळी मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या सामन्यात बंगळूर संघाने तेवढीच तोडीस तोड फलंदाजी केली होती.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय