तिकीट कापण्यात आल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये निर्माण झालेली अवस्थता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेली बैठक वादात सापडले आहे. या बैठकीबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर आयोगाने मुख्यमंत्री कार्यालयाला नोटीस बजावली आहे. उत्तर प्राप्त झाल्यानंतर यावर कारवाई केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर होत असलेल्या राजकीय बैठकांची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या तक्रारीची आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.






मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना नोटीस
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी यांना नोटिसा पाठवल्या आहेत. कारणे दाखवा नोटिसांना उत्तर देण्यात आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.
“आचारसंहिता लागू असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठक झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे आणि नोटीस पाठवली आहे. संबंधित अधिकाऱ्याला आयोगाने नोटीस पाठवली आहे. उत्तर प्राप्त झाल्यावर योग्य ती करवाई करण्यात येईल”, असे चोकलिंगम यांनी सांगितले.
कुणी केली होती तक्रार?
मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर घेतलेल्या या बैठकीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आचारसंहिता लागू होऊन दोन आठवडे उलटे तरी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका होत आहेत. राज्य निवडणूक अधिकारी जागे आहेत का? असा सवाल त्यांनी केला होता. त्याची दखल आता आयोगाने घेतली.
शिवसेना नेत्यांची बैठक
लोकसभा जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार बदलण्यास भाजपने सांगितले. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, खासदारांची बैठक घेतली होती.











