पुणे. : भाजपचे पुणे शहराचे सरचिटणीस राहिलेले सुनील माने यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. सुनील माने हे माजी खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्ती होते.
सुनील माने यांच्यासोबतच माजी नगरसेवक आरिफ बागवान, माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांनीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला.
सुनील माने हे बोपोडी, दापोडी, औंध रोड परिसरातील विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी असून, भारतीय जनता पक्षात पुणे शहरात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. माने व इतर सहकाऱ्यांच्या प्रवेशाने या भागात राष्ट्रवादीला पक्ष विस्तारास गती येईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोदी बाग येथील शरद पवारांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी लिगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.