भाजप पक्ष चिन्हाला काळे फासल्याप्रकरणी दोघांना अटक! आरोपी मात्र मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधीत

0

भारतीय जनता पक्षाच्या वतीने डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील खासगी, सार्वजनिक संरक्षित भिंतीवर येत्या लोकसभा निवडणुकीचा भाग म्हणून पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ काढत जाहिराती करण्यात आल्या आहेत. या ‘कमळ’ चिन्हावर काही लोकांनी काळे फासल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सम्राट मगरे व विशाल कोकाटे यांना अटक केली आहे.

या प्रकरणात सम्राट हा मुख्य आरोपी असून तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे महायुतीमधील भाजप-शिवसेना या मित्र पक्षातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

भाजप केंद्र सरकारच्या कार्यक्रमाप्रमाणे डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीत ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ आणि त्याच्या बाजुला भाजपचे कमळ चिन्ह अशा स्वरूपाच्या जाहिराती सार्वजनिक, खासगी ठिकाणच्या भिंती, संरक्षक भिंतीवर काढून भाजपची प्रचार मोहीम सुरू केली आहे. डोंबिवली पश्चिमेत कोपर भागात देखील या रेखाटून प्रचार मोहीम सुरू केली आहे.

शनिवारी सकाळी कोपर येथील भाजपचे पदाधिकारी यांना कोपर भागातील भाजप कार्यकर्त्यांनी काढलेल्या सर्वच कमळ चिन्हांवर काळे फासले असल्याचे दिसले. यासंबंधी त्यांनी पक्षातील वरिष्ठांना त्याची माहिती दिली. पक्षातील वरिष्ठांनी याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात दोन जण हा प्रकार करत असल्याचे आढळून आले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत मगरे याला शनिवारी सकाळी अटक केली. तर सायंकाळी कोकाटे याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

या प्रकाराचे तीव्र पडसाद भाजपच्या स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील वाद आता नित्याचा ठरु लागला आहे. डोंबिवलीतील पक्षाच्या प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने या दोन पक्षातील वाद शिगेला पोहचला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीरपणे स्थानिक खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भूमीका घेतली होती. यानंतर कल्याण पुर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या मतदारसंघातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र मतभेद आहेत. असे असताना कोपरमधील प्रकारामुळे ही दरी वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा