नव्या समिकरणाची… चर्चा सुरू! श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्रिपद अन् अजित पवार मुख्यमंत्रीचा शब्द

0

मुंबईः अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. परंतु या भूकंपाचे हादरे असे सहजासहजी थांबणारे नाहीत. आणखी पुढे मोठमोठे धक्के राज्याला सहन करावे लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. भाजपचा नवा फॉर्म्युला आधीच ठरल्याचं समोर येतंय. ‘अजित पवार हे भाजपमध्ये आले ते मुख्यमंत्री होण्यासाठीच’ असं ठामपणे बोललं जात आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदेंचं पुनर्वसन करणं, हे भाजपपुढे आव्हान असेल. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ही मांडणी आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वाऱ्या करीत होते. त्याचसोबत खासदार श्रीकांत शिंदे यांचंही दिल्लीला जाणं होई. तेव्हा काही उलगडा झालेला नव्हता. आता मात्र त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ठाम शक्यता पुढे येतेय.

भाजपला हवंय खंबीर नेतृत्व

भाजपला राज्यात एक सक्षम मराठा नेतृत्व पाहिजे. त्यासाठी मागच्या काही वर्षांपासून भाजपचा शोध सुरु होता. एकनाथ शिंदे आले मात्र ते भाजपच्या अपेक्षांना पुरले नाहीत, असं दिसून येतंय. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीपासूनच अजित पवार भाजपमध्ये जातील, अशा चर्चा व्हायच्या. परंतु प्रत्येकवेळी ‘त्या वावड्या होत्या’ असं अजित पवार सांगायचे. आता मात्र भाजपला अजित पवारांच्या रुपाने तगडं नेतृत्व मिळालं आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

देवेंद्र फडणवीसांचं काय होणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमध्ये सध्या काय सुरुय, याचा अंदाज बांधला तर दिल्लीश्वर त्यांच्यावर फारसे खूश आहेत, असं दिसत नाहीत. पक्षांतर्गत नाराजी, २०१९मध्ये स्वबळावर सत्ता आणण्यात आलेलं अपयश, पहाटेचा अयशस्वी शपथविधी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आलेलं अपयश; त्यामुळे मोदी-शाह त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येतं. म्हणूनच शिंदेंचं बंड यशस्वी करुनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नव्हतं.

भाजपने मोठ्या अपेक्षेने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शिवसेना नावाचा तगडा पक्ष मिळावा यासाठी हवी-नको ती मदत केली. परंतु भाजपला शिंदेंमध्ये ते नेतृत्व दिसलं नाही जे त्यांना हवंय. फडणवीसांवर नाराजी, शिंदेंचं अपयश त्यामुळे भाजपला नव्या नेत्याचा शोध होताच. शिवाय तो नेता मराठाच पाहिजे होता. परंतु आता देवेंद्र फडणवीसांचं काय? असा प्रश्न पडतोच. फडणवीसांना केंद्रात जबाबदारी मिळेल, असं नवं समीकरण चर्चिलं जात आहे.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

अजित पवार मुख्यमंत्री होणार?

अजित पवार मागच्या चार ते पाच टर्म उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. कालच्या सभेत आणि त्यापूर्वीही त्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा बोलून दाखवलेली. त्यामुळे केवळ उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार भाजपमध्ये येतील, अशी परिस्थिती नाही. शरद पवार नावाच्या बलाढ्य नेत्याचा पक्ष उभा फोडायचा आणि केवळ उपमुख्यमंत्री व्हायचं, हे रुचत नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचाच शब्द भाजपकडून मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे भाजपने ठरवलेल्या वेळी किंवा येऊ घातलेल्या अधिवेशनानंतर पवार मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि पुनर्वसन

शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजपचे १०५ आमदार असतांनाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचं बक्षीस देण्यात आलं. पुढे शिंदेंच्या दिमतीला शिवसेना पक्ष आला. परंतु नंतर झालेल्या पोटनिवडणुका, विधान परिषद निवडणुका यामध्ये शिंदेंचा प्रभाव दिसून आला नाही. भाजपला जसा खमक्या नेत्या पाहिजे होता, तसा मिळाला नाही. ज्या अजित पवारांची भाजपला मागील कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा होती, ती इच्छा अखेर पूर्ण झाली. त्यामुळे आज ना उद्या अजित पवार मुख्यमंत्री होतील, हे निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद, कल्याण लोकसभा मतदारसंघ राखीव आणि एकनाथ शिंदेंना राज्यात चांगलं खातं; असं हे नवीन समिकरण आहे.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

भाकरी फिरणार!

येत्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात भाकरी फिरवली जावू शकते. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करुन नाराजांना शांत करणं आणि अधिवेशनानंतर मुख्यमंत्रीपदाची खांदेपालट करणं; असा प्लॅन आखल्याची चर्चा आहे. सध्या शिंदे गटात नाराजी दिसून येत आहे. तिन्ही पक्षांना खात्यांचं समान वाटप केलेलं असलं तरी संभाव्य खातेवाटपातही पुन्हा समानच खातेवाटप होईल, हे स्पष्टच आहे. बंडाळ्या रोखून, नाराज्या शांत करुन सर्वांना सोबत घेऊन २०२४च्या निवडणुकीला सक्षमपणे सामोरं जाण्याचा भाजपची प्लॅन आहे, हेच यावरुन दिसून येतंय.