वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. परंतु आता या बंडाविषयी दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता तर ते स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते असा धक्कादायक खुलासा केसरकर यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळजनक उडाली आहे.






दीपक केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही असं जेव्हा वाटायला लागलं असतं, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झाली आहे, पण या लोकांची काही चूक नाही असं सांगितलं असतं आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.
दीपक केसरकर म्हणाले, असं म्हणणारा माणूस कोणत्या दर्जाचा असतो, कशा प्रकारची माणुसकी त्याकडे असते? प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, असे म्हणाऱ्या माणसामागे लोकं उभी नाही राहणार तर कोणाच्या पाठीमागे उभे राहणार असेही ते म्हणाले.
गद्दार कोणाला म्हणताय?
दीपक केसरकर म्हणाले, शरद पवार यांनीही बंड केले होते ना? मग पवारांनी केला तो उठाव आणि शिंदेंनी केली ती गद्दारी? असं कसं? मंत्र्यांना भेट मिळत नव्हती, ते काय राजे होते का? तुम्ही तुमच्या घरी राजे, त्यांनी गद्दार बोलणं हे हास्यास्पद आहे अशा शब्दात केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली.
‘उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे’
ते म्हणाले, बजेटवर बहिष्कार करणार म्हटल्यावर आमच्या आमदारांना निधी मिळाला, मी त्याचा साक्षिदार होतो. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. वर्धापनदिनाच्या दिवशी तुम्ही एक नंबरच्या नेत्याचा आपमान केला, त्यानंतर मी निघून गेलो असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्र सोडलं.
चौकशीनंतर खरे चेहरे समोर येतील
मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप झालेले आहेत. ४७५५ कोटींच्या कामामध्ये अनियमितता झालेली असून काळ्या यादीतील लोकांना कामे देण्यात आली. १२ हजार कोटींच्या घोटाळ्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही. या चौकशीनंतर खरे चेहरे समोर येतील असे केसरकर म्हणाले.










