शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संघटनात्मक काम द्यावं अशी मागणी केली. पक्षबांधणीमध्ये मी योगदान देऊ इच्छिते, शिंदे साहेब मला जबाबदरी देतील, अशी अपेक्षा मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली. मनिषा कायंदे यांची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली.






मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव म्हणून नियुक्ती करण्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली. ‘आपण आमदार, प्रवक्त्या आहातच पण सचिव म्हणूनही काम करा. शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला सचिव म्हणून संधी दिली आहे. मनिषाताईंना मोकळेपणाने काम करण्याची संधी द्यायचा निर्णय घेतला आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेत प्रवेश का केला? ठाकरेंचं नाव घेत मनिषा कायंदेंनी सांगितलं कारण
काय म्हणाल्या मनिषा कायंदे? ‘माझ्यासाठी मान सन्मानाचा दिवस. ही ओरिजिनल अधिकृत शिवसेना. ही आता एकनाथ शिंदेंकडे आहे, बाळासाहेबांची शिवसेना. 2012 साली मी शिवसेनेत प्रवेश केला, प्रवक्ता झाले, आमदार झाले. इमानेइतबारे काम केलं. कुठलंही पक्षविरोधी काम केलं नाही. सभागृहाच्या आत आणि बाहेर भूमिका भक्कमपणे मांडली.
एकनाथ शिंदेंनी मला नेहमीच साथ दिली’, असं मनिषा कायंदे म्हणाल्या. ‘एका वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ दोषारोप केले, आत्मपरिक्षण केलं नाही. लोकं सोडून का चालले आहेत? तिथली लोकं इकडे येतील, कारण त्यांचा शिंदेंवर विश्वास आहे. आपल्याला परफॉर्मन्स पाहिजे, सकाळी थुकरटवाडी बघण्यासाठी लोक चॅनल लावत नाही’, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. सकाळी उठून आमच्या देवीदेवतांचा अपमान करणारे, खिल्ली उडवणारे, असली लोकं हिंदुत्वाचा शिवसेनेचा चेहरा कसे? असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.











