भगवे कपडे घालूनच सीतेचं अपहरण केलं होतं, मग भगवे कपडे घालणारे सगळे…” पटोलेंचा टोला

0

नाना पटोलेंनी नेमकं काय म्हटलं आहे?
भगवे कपडे घालणारे सगळे साधूच असतात असं नाही. रावणाने भगवे कपडे घालूनच सीतेचं अपहरण केलं होतं, असं वक्तव्य आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. हिंदूंचं ठेकेदारपद यांना कुणी दिलेलं नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अयोध्येचा दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरयू तीरावर आरतीही केली. या सगळ्यावर आता टीका होते आहे. नाना पटोलेंनीही एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

काय म्हटलं आहे नाना पटोलेंनी?
“हिंदूंचे ठेकेदार म्हणून यांना कुणी प्रमाणपत्र दिलेलं नाही. भगवे कपडे घातले म्हणून कुणी हिंदू होत नाही. स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणणं हे सोंग घेणंच आहे. रावणानेही भगवे कपडे घालून सीतेचं अपहरण केलं. त्यामुळे भगवे कपडे घालून सगळे साधू संत होतात असं नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही टीका केलेली असताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भगव्या रंगावरून भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी एक ट्वीट करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंना एक प्रश्न विचारला आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

काय आहे सचिन सावंत यांचं ट्वीट?
भगवी बिकीनी चालत नाही पण भगवा कार्पेट चालतो. बिनधास्तपणे पादत्राणे घालून भगवा कार्पेट तुडवा. जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळून सत्तेचा सारीपाट भाजपा कसा मांडते यांचे हे उदाहरण. दांभिकपणा हा भाजपाचा स्थायीभाव आहे. धार्मिक द्वेष पसरवण्यातून यांचे राजकारण होते पण देश कमजोर होत आहे. असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही राज्यात रावणराज आहे अशी टीका केली होती. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांची तुलना रावणाशी केली होती. तसंच चोरलेल्या धनुष्यबाणामुळे शौर्य गाजवता येत नाही असं म्हटलं होतं. तसंच शिंदे गटात अस्वस्थता आहे असंही वक्तव्य केलं होतं. यानंतर आता नाना पटोले यांनीही एकनाथ शिंदे आणि भाजपाची तुलना रावणाशी केली आहे. या टीकेला काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?