WPL 2023 : महिलांच्या ‘डब्ल्यूपीएल’ला आजपासून प्रारंभ; मुंबईची गुजरातशी लढत

0

मुंबई – बीसीसीआयतर्फे आजपासून (शनिवार) महिलांच्या परिपूर्ण आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना यजमान मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्‌स यांच्यात होणार आहे. महिलांच्या आयपीलचे प्रदर्शनीय सामने यापूर्वीही अनेकदा खेळवले गेले होते. मात्र, यंदापासून पुरुष खेळाडूंप्रमाणे महिलांच्या पूर्ण आयपीएलला यंदापासून प्रारंभ होत आहे.

ही लीग जागतिक स्तरावरची सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत महिला क्रिकेट लीग ठरणार आहे. ही स्पर्धा 23 दिवस चालणार असून सलामीचा सामना मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. तर अंतिम सामना येत्या 26 मार्चला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या दोनच स्टेडियममध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाणार आहे. या 23 दिवसांत 5 संघ 22 सामने खेळणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

20 लीग, एक एलिमिनेटर आणि एक अंतिम सामना होणार आहे. यंदाच्या पहिल्याच मौसमात चार डबल हेडर सामने खेळवले जातील. यंदा लीगमध्ये केवळ 5 संघच असले तरी भविष्यात त्यात वाढ होऊ शकते. सध्याच्या रचनेत दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्‌स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे.

मानधना सर्वात महागडी खेळाडू

भारताच्या महिला संघाची उपकर्णधार व स्टार फलंदाज स्मृती मानधना यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) तब्बल 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. तर ऑस्ट्रेलियाची ऍश्‍लले गार्डनर व इंग्लंडची नताली स्किव्हर ब्रंट या परदेशातील सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या असून त्यांना 3.20 कोटी रुपये रक्कम मिळाली आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात तब्बल 448 खेळाडू सहभागी झाले होते. एकूण 87 खेळाडूंना खरेदी करण्यात आले. यामध्ये 30 परदेशी व 57 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात पाच संघांनी 59 कोटी 50 लाख रुपये खर्च केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

नेत्रदीपक ठरणार उद्‌घाटन सोहळा

या स्पर्धेसाठीचा शुभंकर हणून वाघीण आहे. त्याचे शक्ती असे नामकरण करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यासह काही प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी एक नेत्रदीपक उद्‌घाटन सोहळा होणार आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीसह अनेक नावाजलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.