पुणे : पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. पुण्यात चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतं म्हणून राज्यभरातील हजारो तरुण इथे शिक्षणासाठी येतात. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांची संख्या मोठी आहे. अनेक जण काहीतरी मोठं होण्याची आशा आणि स्वप्न घेऊन पुण्यात येत असतात. तसेच पुण्यात शिक्षण घेऊन अनेक जण यशस्वीदेखील झाले आहेत. पण याच पुण्यात आता विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा होत असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यात मनसे विद्यार्थी सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी सेना यांच्यात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. आधी मनसेच्या विद्यार्थी सेनेविरोधात कॉलेजमध्ये पोस्टर लागले. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे विद्यार्थी सेनेकडून जी कृती झाली त्या विरोधात अभाविपने घोषणाबाजी देत आंदोलन केलं. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.






नेमकं प्रकरण काय?
पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये ‘बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना’ अशा आशयाचे पोस्टर लावले होते. यावरुन मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. आक्रमक झालेल्या मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाला कुलूप लावलं. त्यामुळे अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.











