पुणे शहर भारतीय जनता पक्षामध्ये सध्या नाराज लोकांची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने नामी शक्कल लढवली असून आगामी महापालिकेमध्ये तथाकथित नामांकित लोकांसाठी ‘सेफझोन’ चा प्रभाग बनवण्यात आल्याचे गाजर दाखवण्यात आले असून प्रतिष्ठित मानाच्या पदासाठी तीन- तीन दावेदार तयार झाले आहेत. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आणि त्यानंतर शहराध्यक्षपद डावलल्याने भाजपातील काही स्थानिक वरिष्ठ नेते नाराज झाले होते. त्यातच महाराष्ट्र प्रदेशाच्या निर्णयानुसार पुणे शहरातील प्रभाग रचनेची जबाबदारी ज्या 3 चेहऱ्यावर देण्यात आली होती त्यामध्येही या वरिष्ठांना डावलण्यात आल्याने या वरिष्ठ नेत्यांची समजूत काढताना भविष्यात पक्षाने तुमच्यासाठी मोठा विचार केला असल्याचं सांगत या नेत्यांना महापौर पदाचं प्रलोभन देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर 3 नेत्यांना आगामी महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदाचं आश्वासन देत स्थानिक च्या निवडणुका मार्गी लावण्याची मानसिकता नेतृत्वाने स्वीकारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता शहराच्या मध्यवर्ती भागातील काही प्रभावशाली नेत्यांसाठी खास 3 सदस्यांचे प्रभाग तयार करण्यात येतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रात सध्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रमुख नेत्यांना पक्षासाठी निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले अशा प्रभावशाली नेतृत्वासाठी प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आले असल्याचेही चर्चा सध्या पुणे शहरात सुरू आहेत.हे प्रभाग मुख्यतः कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांत असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरातील महापौर पदाचं आश्वासन दिलेल्या प्रभावशाली नेत्यांसाठी सेफ झोन बनवण्यात येतोय का? अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने प्राधान्यक्रम ठरवत केलेल्या आराखड्याचा विचार केला तर पुणे महापालिकेची आगामी निवडणूक 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस होण्याची शक्यता असून, सध्या राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेला 4 ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर करावी लागणार आहे. 2022 च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या सुमारे 34.81 लाख असून, त्यासाठी 165 नगरसेवकांची तरतूद आहे. प्रत्येक प्रभागामध्ये चार नगरसेवक असतील, अशी प्राथमिक मांडणी आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तीन किंवा पाच सदस्यांचे प्रभाग ठेवण्याचीही शक्यता आहे, विशेषतः जिथे भौगोलिक व लोकसंख्येचा समतोल साधणे आवश्यक आहे. पर्वती, कसबा आणि कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघातील काही अनुभवी आणि प्रभावशाली माजी नगरसेवकांना लक्षात घेता, त्यांच्यासाठी तीन सदस्यांचे प्रभाग तयार केले जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पाच सदस्यांचा प्रभाग शक्य?
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुण्यात 165 जागांसाठी जर 39 प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे ठेवले, तर 156 सदस्यांचा समावेश होईल. उर्वरित 9 जागांसाठी प्रत्येकी तीन सदस्यांचे तीन प्रभाग तयार करावे लागतील. दुसरीकडे, जर 40 प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे ठेवले, तर 160 सदस्यांचा समावेश होतो आणि उर्वरित पाच जागांसाठी 1 पाच सदस्यांचा प्रभाग ठेवावा लागेल. मात्र, अशा प्रभागाची लोकसंख्या सुमारे 1.20 लाख होऊ शकते, त्यामुळे त्यासाठी भौगोलिक आणि लोकसंख्येचा समतोल राखणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
दरम्यान, प्रभाग रचनेचे काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असून भाजपकडून आपल्याला हवे तसे प्रभाग तयार करण्यात येत असल्याचा आरोप नुकताच काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव देखील घेतली आहे. अशातच 3च्या प्रभागाबाबत माहिती संपूर्ण पुणे शहरात चर्चेत आल्याने शहरातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.