साहित्य कलावंत प्रतिष्ठान आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोगोचे अनावरण व वारजे मित्र पाक्षिकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. मोरे सर म्हणालेत, वारजे ह्या उपनगरात मा. दिलीप बराटे व त्यांच्या सहविचारी सहकाऱ्यांनी 25 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही साहित्य चळवळ आज महाराष्ट्रातील एक व्यापक चळवळ म्हणून ओळखली जाते.






संस्था सुरू करणे सोपे असते पण समाजाला सोबत घेऊन अव्याहतपणे 25 वर्ष संस्थेचे काम सुरू ठेवणे खूप अवघड आहे. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान एका निष्ठेने ते काम करीत आहे. अशा संस्था समाजात काम करतात म्हणून सांस्कृतिक चळवळ आणि साहित्यिक वातावरण निर्माण होत राहते. समाजाला चांगल्या विचारांनी बांधून ठेवण्याचे काम करीत असतात .पुढे अनेक वर्षे ही संस्था काम करीत राहील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ संपादक मा. यमाजी मालकर उपस्थित होते. साहित्य संस्थेचे मुखपत्र असणे खूप महत्त्वाचे आहे.
एक वैचारिक भूमिका घेऊन समाज प्रबोधनासाठी प्रतिष्ठान पंचवीस वर्षे काम करीत आहे ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. वारजे हे एका जिल्ह्याची लोकसंख्या असलेला परिसर आहे. या भागाची सांस्कृतिक व साहित्यिक भूक भगविण्याचे काम संस्था करीत आहे याचा आनंद वाटतो. पाक्षिक सुरू करणे सोपे आहे पण ते वाचणाऱ्या वाचकांपर्यंत योग्य पद्धतीने वितरण होणे महत्त्वाचे आहे असे मत मा. मालकर यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. दिलीप बराटे यांनी प्रतिष्ठान स्थापने मागची भूमिका विशद केली. पूर्वी वारजे हे छोटे उपनगर होते .या भागातील काही साहित्यिक मंडळी एकत्रित येऊन उपेक्षित आणि दुर्लक्षित साहित्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या विचारातून आम्ही सर्वांनी 2000 मध्ये साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानची स्थापना केली.
आज संस्था रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत काम करते आहे याचे मलाही समाधान वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी परिसरातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वारजेचे माजी सरपंच मा. श्रीकृष्ण बराटे, सामाजिक कार्यकर्ते मा.आप्पा दांगट, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. शैलेश त्रिभुवन, खजिनदार मा. संजय भामरे, उपाध्यक्ष मा.राजेंद्र वाघ, जेष्ठ सदस्य मा. के.डी. पवार,मा. अविनाश जाधव ,मा.सतीश सुरवसे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सुप्रसिद्ध चित्रकार मा. जयदीप कडू यांनी लोगो तयार केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव श्री वि.दा. पिंगळे यांनी केले तर आभार वारजे मित्र पाक्षिकाचे मुख्य संपादक श्री देवेन्द सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. पावश्या गणपती विरंगुळा केंद्र वारजे पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.












