पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग रचना केली जाणार आहे. त्याच वेळी कोणत्या पक्षाला, कोणत्या माननीयांना ही प्रभाग रचना सोईस्कर होणार अशीही चर्चा रंगलेली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी या अशा चर्चांना मी थारा देत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच प्रभाग रचना होईल. यात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही अशी स्पष्टोक्ती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.






राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेनंतर त्यावर हरकती सूचना मागविणे, त्यावर सुनावणी घेणे. सुधारित प्रभाग रचनेस निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया ४ सप्टेंबर पूर्वी पूर्ण होणार आहे. पण प्रारूप प्रभाग रचना हीच महत्त्वाची असून, हरकती सूचनांवर सुनावणी घेतली तरी त्यात मोठ्या प्रमाणात बदल होत नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
प्रभाग रचनेबाबत विचारले असता आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, अद्याप प्रभाग रचनेच्या काम अद्याप सुरु झालेले नाही. प्रभागांची रचना करताना रस्ते, नैसर्गिक हद्दी याचे नियम पाळले जातील. मी अनेक निवडणुकांमध्ये काम केले आहे, त्यामुळे ही कामे करताना कोणत्याही राजकीय दबावाला पडणार नाही, हस्तक्षेप होऊ देणार नाही. शासनाच्या नियमांचे पालन करून ही कामे केली जातील.











