ब्लुमबर्गचे पहिले भारतीय सल्लागार ठरले सुरेश प्रभू

0
1
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लुमबर्गच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती होणारे ते पहिले व एकमेव भारतीय ठरले आहेत. या मंडळावर इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती जोको विदोदो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आणि अनेक उद्योग नेत्यांचा समावेश आहे.

सुरेश प्रभू हे सहा वेळा खासदार आहेत. त्यांनी वाजपेयी सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या पहिल्या दोन कार्यकाळात कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. प्रभूंनी उद्योग, वीज, पर्यावरण आणि वन, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, वाणिज्य आणि उद्योग आणि खते आणि रसायने अशी अनेक कॅबिनेट विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी जी-७ आणि जी-२० या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये प्रधानमंत्र्यांचे शेर्पा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. जी-७ आणि जी-२० शिखर परिषदेसाठी भारत सरकारच्या अधिकृत अजेंडाला आकार देण्यात प्रभूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
श्री. प्रभू हे एक नामांकित चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आणि सध्या हरियाणातील सोनीपत येथील ऋषिहूड विद्यापीठाचे कुलपती आहेत. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यागत प्राध्यापक देखील आहेत.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल संवाद आणि वादविवादाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अमेरिकेच्या माजी वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि इटलीच्या पंतप्रधान आणि युरोपियन सेंट्रल बँकेचे अध्यक्ष असलेल्या मारियो द्राघी यांनी काल एका नवीन सल्लागार मंडळाची घोषणा केली.
“ब्लूमबर्गच्या बोर्डाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. जागतिक नेत्यांमध्ये परस्पर संवाद वाढविण्याच्या माइक ब्लूमबर्ग यांच्या मिशनमध्ये योगदान देण्याची संधी मला या नियुक्तीने मिळाली आहे.जग भू-राजकीय अनिश्चितता, तंत्रज्ञानातील गतिमान बदल आणि वाढत्या हवामान संकटाच्या या काळातून जात असताना, जागतिक समृद्धीसाठी समान आधार शोधणे आणि उभारणी करणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे,” असे अमेरिकेच्या माजी वाणिज्य सचिव जीना रायमोंडो म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “जागतिक वाणिज्यातील लवचिकता कशी मजबूत करता येईल आणि या आव्हानांवर दीर्घकालीन उपायांवर सहकार्य कसे करता येईल यावर चर्चा करण्यासाठी मी माझ्या सहकारी बोर्ड सदस्यांना बोलावण्यास उत्सुक आहे.”

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमीची स्थापना २०१८ मध्ये झाली असून, ही बहुराष्ट्रीय सीईओ, सार्वजनिक अधिकारी, नवोन्मेषक (इनोव्हेटर) आणि वित्तपुरवठादारांची एक जागतिक संस्था आहे. सिंगापूर, बीजिंग, पनामा सिटी, डब्लिन, माराकेश आणि साओ पाउलो येथे मेळावे आयोजित केले जातात.