पुणे जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारेभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.






जिल्ह्यातील द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास साठ टक्के संपला आहे, शेतात द्राक्ष आहेत. शेतात असलेल्या द्राक्षांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यावर्षी द्राक्षाचा सुरुवातीचा हंगाम चांगला झाला. रोगांचा प्रादुर्भावही कमी झाला आणि बाजारभाव देखील समाधानकारक मिळाला. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षाची छाटणी उशिरा केली, त्यांच्या बागा अवकाळी पावसात सापडल्या आहेत.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या काढणी सुरू असलेल्या कांदा, गहू आणि कोथिंबिरीसह इतर पालेभाजी, फळभाजीला या पावसामुळे फटका बसला आहे. शेतीच्या मशागतीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची कामे काही दिवस खोळंबणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा कृषी विभागाकडून आढावा घेण्यात आला.
त्यामध्ये अंदाजे शंभर हेक्टर नुकसान झाले असू शकते असा अंदाज काचोळे यांनी व्यक्त करून पुढील काही दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची आकडेवारी समोर येईल. पंचनामे तातडीने केले जातील, असेही काचोळे यांनी सांगितले.










