मुंबई दि. १६ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे माजी चिटणीस, गटक्रमांक ३२ बोरिवली-दहिसर विभागाचे विभाग प्रतिनिधी, रिपब्लिकन सेना मुंबई विभागाचे सरचिटणीस मौजे गाव इनाम पांगरी, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र गजानन भागूराम तांबे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ वा वाढदिवस व गजानन भागूराम तांबे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली गजानन तांबे यांच्या लग्नाचा ५५ वा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे यांनी शुभेच्छापर भाषण देत असताना “चिटणीस असावा तर गजानन तांबें सारखा, चिटणीस पदाला न्याय देण्यासाठी तन, मन, धन अर्पण करून त्यांनी स्वतःला समाजकार्यासाठी झोकून दिले, चिटणीस पदाला साजेसा असा कारभार त्यांनी नेहमीच करीत येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नांना, अडचणींना मार्ग काढून देण्याच काम त्यांनी केलं, सभासदांना योग्य माहिती, मार्गदर्शन त्यांनी सदैव केले, कोकण दौरा असो, दफ्तर तपासणी असो किंवा मुंबई विभागातील कार्यकर्त्यांचे प्रश्न असो ते हसतखेळत सोडविण्याचे कार्य त्यांनी बिनचूकपणे पार पाडल, बोरिवली-दहिसर विभागात ही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या खांद्याला लावून त्यांनी काम केले आहे” असे गौरवोद्गार काढून त्यांनी गजानन तांबे व उभयतांस वाढदिवस व लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गजानन तांबे व वैशाली गजानन तांबे यांचे मंगल परिणय १९७० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे झाले होते म्हणून त्यांच्या लग्नाचा ५५ वा वाढदिवस व अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसाचा सन्मान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे येऊन समितीच्या वतीने करण्यात आलेला गौरव स्वीकारला. सदर वाढदिवस सोहळ्या दिवशीच बौद्धजन पंचायत समितीच्या २०२५-२६ वार्षिक बजेटची मिटिंग असल्याकारणाने सर्वच व्यवस्थापक मंडळाचे विश्वस्त, मध्यवर्ती कार्यकारिणी त्याचबरोबर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे तसेच प्रकाश जाधव हे उपस्थित असल्याने त्यांनीही गजानन तांबे व सौ. वैशाली गजानन तांबे यांना ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या व लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.