इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर फरार झालेला प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने झटका दिला आहे. आज अंतरिम जामीनावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून अटकपूर्वक जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.






इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर हा फरारी आहे. वकिलांच्या मार्फत त्याने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अंतरिम जामीन मिळवला होता. त्याची 11 मार्चला मुदत संपल्याने त्यावर सुनावणी घेण्यात आली होती. त्या सुनावणीत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने झटक देत जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
सुनावणीत सोमवारी नेमके काय झाले होते?
अंतरिम जामीनबाबत सोमवारी सुनावणी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत काहीही बोलण्याचा अधिकार प्रशांत कोरटकर याला आहे का? बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. छत्रपती संभाजीराजे यांना कोरटकर ‘ऐशी होते’ असे म्हणतो. बाजीप्रभू देशपांडे नसते, तर शिवाजी महाराज नसते, असं आरोपी कोरटकर म्हणतो, अशा आरोपींना संरक्षण द्यायचे का? त्यामुळे अंतरिम जामीन नामंजूर करावा, अशी मागणी सरकारी वकील शुक्ल यांनी केली होती.
धमकी प्रकरणातील व्हायरल कॉलमधील आवाज हा माझा नाही, असं म्हणणारा आरोपी पसार कसा काय होतो? असा युक्तीवाद ॲड असीम सरोदे यांनी केला होता. दरम्यान, कोरटकरचे वकिल सौरभ घाग यांनी ‘कोरटकर हा तपासात सहकार्य करणार असून त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. कोरटकर याचा फोन कधीही हॅक झालेला नाही. हॅक झाला असेल तर ते पोलिसांसमोर कधीच आलेले नाही. पोलिस अधिकाऱ्यांनीही तसे न्यायालयात सांगितले होते.
इंद्रजीत सावंत यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काही अपशब्द काढले असतील, तर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करावा. पण, ब्राम्हण समाजाबद्दल इंद्रजीत सावंत असं काय म्हणाले, ज्यामुळे कोरटकर हे संतप्त झाले, याचे कारण समोर आले पाहिजे, त्यामुळे कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तीवाद ॲड. सरोदे यांनी केला होता.
दरम्यान, प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग म्हणाले की, कोरटकर हे तपास कामी आवाजाचे नमुने देण्यास तयार असल्याचे वकिला मार्फत न्यायालयास कळवले आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि माध्यमांमुळे मला अडचणी निर्माण होऊ शकतात. तपास कामात आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही कोरटकर याने वकिलामार्फत न्यायालयात सांगितले.
दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावनीनंतर न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला होता. कोल्हापूर न्यायालयाने आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.











