मुंबई : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या गोटातले नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या मिशनला ऑपरेशन टायगर असे नाव दिलं गेलंय . राजन साळवींच्या प्रवेशानंतर ऑपरेशन टायगरला वेग आल्याचीही चर्चा आहे. पण धाराशिवमध्ये या ऑपरेशन टायगरचं टायमिंग काहीसं चुकल्याच बोललं जातंय. धाराशिवमध्ये तावडीतला वाघ कसा निसटला याची कहाणी स्वतः मंत्रीमहोदय प्रताप सरनाईकांनी सांगितली आहे.
राज्याच्या राजकारणात गेले कही दिवस ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंनी सुरु केल्याचं कळतंय. राजन साळवींच्या प्रवेशानं ऑपरेशन टायगरची पहिली झलकही पहायला मिळाली. आता ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना परीवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक मोठा खुलासा केलाय. राज्यातल्या शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबबादारी असल्याचं सरनाईकांनी कबुल केलंय. इतकंच नाही तर तर धाराशिवमधलं ऑपरेशन टायगर अगदी थोडक्यासाठी कसं हुकलं याचीही बिहाईंड द सीन स्टोरीच प्रताप सरनाईकांनी सांगितली.
ऑपरेशन टायगर होणार यशस्वी?
महायुतीचं स्थिर सरकार राज्यात अस्तित्वात असलं तरी तिन्ही पक्ष आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहे. शिंदेंची सेनाही त्याला अपवाद नाही. संख्याबळ वाढवून राज्यात आणि केंद्रात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ऑपरेशन टायगरमधून होत असल्याची चर्चा आहे. आता आगामी काळात ऑपरेशन टायगरला मिळणारं यशच ठाकरे आणि शिंदे दोघांच्याही पक्षांची पुढची दिशा स्पष्ट करेल