राज ठाकरेंनी आपली पूर्ण ताकद लावली. दौरे,सभा,मेळावे,बैठका यांनी मनसेला बळही दिलं. पण महायुतीच्या लाटेसमोर मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मनसैनिकांना मोठा आदेश दिला आहे.






राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची मुंबईत गुरुवारी(ता.20)महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी मनसेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धर्तीवर महत्वाच्या सूचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी संघटनात्मक बदलाचे संकेतही दिले. मुंबई महापालिका निवडणुकीसह मनसेच्या पुढील राजकीय दिशा, ध्येयधोरणं यांसह रणनीतीवरही ठाकरेंनी यावेळी भाष्य केलं.
याचवेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं एकत्र जमण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरचा पहिलाच मराठी भाषा दिन यंदा साजरा होत आहे. हीच संधी साधून आगामी काळात मराठी भाषेचा मुद्दा मनसे उचलून धरण्याच्या हेतूनं मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याचमुळे मनसैनिकांना राज ठाकरेंनी यंदा मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करायचा असून या सोहळ्याला सहकुटुंब या, असं आवाहन केलं आहे.
केंद्र सरकारकडून घटस्थापनेच्या दिवशीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा दिला होता,त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’,असंही त्यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं होतं.











