राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची सव्वा तास चर्चा झाली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर मनसेकडून काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीबद्दल माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी निकालावर संशय व्यक्त केला होता. राज्यात वाढलेल्या मतदारांच्या संख्येसह इतर मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चर्चा फक्त तुम्ही करताय. ही कोणतीही राजकीय भेट नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळी मी सांगितलं होतं मी घरी येईन. मी घरी गेलो होतो, ब्रेकफास्ट केला. गप्पा मारल्या. या बैठकीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो.
रणवीर अलाहाबादियाच्या व्हायरल व्हिडीओवरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,’अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहेत. समाजात अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत. त्याची हद्द ओलांडली तर त्यावर कारवाई केली जाईल.’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर इलाहबादिया हा स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला. तुम्हाला पालकांना सेक्स करताना पहायचंय की त्यांच्यासोबत जॉइन व्हायचंय? असं रणवीरने विचारलं. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.