कुछ तो गडबड है! शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, हे आहे वास्तव; ……फक्तं यावरच मनोमिलनचा निर्णय

0

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची इच्छा पक्षातील कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली आहे. अधिकृतपणे मात्र अशी कोणतीही चर्चा पक्षांच्या पातळीवर नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही भूमिका मांडली जात आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार कुटुंबीयांची उपस्थिती, या भेटीनंतर दोन्ही कुटुंबातील आणि पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘कुछ तो गडबड है,’ असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दोन्ही राष्ट्रवादींनी अर्थात दोन्ही पवारांनी एकत्र येण्याची भावना व्यक्त केली जात आहे. घटक पक्षांची होत असलेली वाताहत, अनेक मुद्यांवर असणारा विसंवाद, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची आणि नवनिर्वाचित काही आमदारांची देखील अशीच भावना आहे. मात्र अपवाद वगळता आयुष्यभर जातीयवादी विचारांना विरोध करणारे शरद पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाण्यासारखेच आहे. त्यामुळे एकत्रिकरणाची चर्चा ही पेल्यातील वादळ ठरणार की पवार आणखी एखादी राजकीय खेळी करणार, हे ‘राष्ट्रवादी’च्या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

शिवसेनेतील उभी फूट, ‘राष्ट्रवादी’ची झालेली दोन शकले यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे केलेले पानिपत आणि लगेच सहा महिन्यांनी त्याच जनतेने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा केलेला सुफडासाफ, तर दारूण परभवानंतर विरोधकांनी ‘ईव्हीएम’वर उपस्थित केलेले प्रश्न अशा घटनांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले.

या अडीच वर्षांच्या काळात महत्त्वाची घडामोडी होती ती अजित पवार यांनी शरद पवार यांना रामराम ठोकत भाजपशी केलेला घरोबा. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षच ताब्यात घेत शरद पवारांना धोबीपछाड दिला. पक्षाचे निवडून आलेले आमदार, खासदार, जिल्ह्याचे अध्यक्ष, पदाधिकारी अशा सर्वांना सोबत घेऊन त्यांनी शरद पवारांना जोरदार धक्का दिला. पवार यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात हा सर्वांत मोठा झटका होता.

शरद पवारांच्या राजकारणात कधी भावनेला स्थान मिळाले नाही. ना त्यांनी कधी सहानुभूतीचे राजकारण केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर त्यांच्याविषयी राज्याच्या राजकारणात सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली. या लाटेचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आघाडीने युतीचा या निवडणुकीत धुव्वा उडविला. एकप्रकारे मतदारांनी ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेनेत पडलेली फूट चुकीचे असल्याचेच दर्शविले. या निवडणुकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिकरित्या जोरदार हल्ला केला.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

बहिणीच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देऊन अजित पवार यांनी कौटुंबिक संबंधानाही सुरुंग लावला. तर पुढे जाऊन विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांच्या सख्ख्या पुतण्याला उमेदवारी देत, शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीची परतफेड केली. मात्र अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने पुतण्याला आणि एक प्रकारे शरद पवार यांना मात दिली.

महाविकास आघाडीत मतभेद

महाविकास आघाडीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मतभेद आहेत. शिवसेना व काँग्रेस एका तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती आहे. सावरकरांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र लढण्याबाबत आघाडीत एकवाक्यता दिसत नाही. त्यामुळेच आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

या सर्व बदललेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, असा सूर दोन्ही पक्षातून निघू लागला आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून हे एकत्रीकरणाचे वारे वाहू लागले आहे. त्यातच रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही एकत्र येण्याच्या भूमिकेला दुजोरा देत, पवार कुटुंबियातील सदस्यांच्या भावनाच एक प्रकारे बोलून दाखवल्या. एकत्र येण्याची ही चर्चा दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू झाली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घातले, तेव्हा या चर्चांना अधिक जोर चढला. एकत्र यायचे असेल तर जुन्यांवर अन्याय नको, अशी भावना अजित पवार गटात निर्माण झाली आहे. किंबहुना त्याबाबत पक्षाच्या नेत्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही सुचवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची काही अडचण असण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र खरा प्रश्न आहे तो शरद पवार यांचा.

आयुष्यभर जातीयवादी विचारांशी लढा देत असताना, पडेल ती किंमत मोजली असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे एकत्रीकरण करून प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष जातीयवादी विचारांकडे जाणे शरद पवार यांना कितपत रुचेल, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कुटुंबीय, नेते, कार्यकर्ते काय विचार मांडतात यापेक्षा शरद पवार काय भूमिका घेतात, यावरच मनोमिलनचा निर्णय घेतला जाईल.