काँग्रेसलाही नकोय महाविकास आघाडी?; या शहरात आगामी निवडणुकांसाठी वेगळी ‘स्ट्रॅटेजी’ सुरूही झाली

0
4

विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले मोठे यश आणि राज्यात सत्ता आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीबाबत संभ्रमात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत बोलणी सुरू असली तरी मुंबई वगळता इतर ठिकाणी काँग्रस महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येते.

नागपूरमध्ये मागील निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून आला होता. काँग्रेसलासुद्धा फक्त 29 जागांवर समाधान मानावे लागले होते. असे असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि उत्तर नागपूरमधून माजी मंत्री नितीन राऊत निवडून आले आहेत.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

ठाकरेंच्या सेनेला यावेळी नागपूर शहरातील जागाच सोडण्यात आली नव्हती तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ हट्टाने मागून घेतला होता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती. मात्र ते मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. काँग्रेसला मध्य आणि दक्षिण नागपूरमधून मोठी आशा होती. मात्र सुमारे पंधरा हजार मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

मध्य नागपूरमधून बंटी शेळके यांनी 80 हजार मते घेतली तर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून गिरीश पांडव यांनी एक लाखांच्यावर मते घेतली आहेत. हे बघता सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची व्होट बँक शाबूत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पराभव झाला तरी चालेल मात्र स्वबळावर लढावे अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे.

अधिक वाचा  कर्वेरोड सार्वजनिक गणेश विसर्जन नियमित वेळेतच; सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समितीचे बहुमूल्य योगदान

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला वीस वर्षांत पक्ष वाढवता आला नाही. नगरसेवकांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. महापालिकेत त्यांना सोबत घेतल्यास काँग्रेसची संख्यासुद्धा घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शहरातील सर्व 150 जागा काँग्रेसने लढवाव्यात, आघाडीच्या भानगडीत पडू नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.

महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाला सोबत घेऊन लढायची, याबाबत भाजपने आपले धोरण निश्चित केले आहे. महायुती करण्याचे अधिकार भाजपने स्थानिक नेत्यांकडे सोपवले आहे. काँग्रेसने अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.