ठाकरे गटाची विरोधी पक्षनेतेपदासाठी थेट मोर्चेबांधणी, नाना पटोलेंची बोलकी प्रतिक्रिया… फक्तं आमची ही अपेक्षा होती

0

मागच्या महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला पुन्हा एकदा दणदणीत यश मिळालं होतं. तर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा धुव्वा उडाला होता.एकतर्फी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची एवढी बिकट अवस्था झाली होती की, तिन्ही पक्षांपैकी एकाही पक्षाला विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संख्येएवढ्या म्हणजेच किमान २८ जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षाने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घेतलेल्या भेटीतही त्याबाबत चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या नाना पटोले यांची या घडामोडींबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

विधानसभा निवडणुकीतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या हालचालींबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाकडे अधिक संख्याबळ आहे. त्यांचे २० आमदार निवडून आलेले आहेत. तर आमचे १६ आमदार आहेत. स्वाभाविकपणे विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्याकडून नाव समोर येणारच. मात्र महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी, अशी आमची अपेक्षा होती. पण त्यांनी स्वत:च नाव दिलं असेल तर त्यावर कुठली प्रतिक्रिया व्यक्त करण्याचं कारण नाही.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांना मिळून ५० पेक्षा कमी जागा जिंकता आल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक २०, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागांवर विजय मिळवता आला होता.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार