महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेच. त्यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही.
“कोण वरिष्ठ? मी नाराजच आहे. अजित पवारांशी यावर बोलण्याची गरज वाटत नाही”, अशी टोलेबाजी छगन भुजबळ यांनी करताच, ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. नाशिक, बुलढाणा इथं ‘रास्ता रोको’ आंदोलन करत अजित पवार यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. डावलले काय आणि फेकलं काय? फरक पडत नाही. मंत्रीपद किती वेळा आले अन् गेले, पण छगन भुजबळ संपला नाही. ज्यांनी मला मंत्रीपद दिले नाही, त्यांना विचारा की, का दिले नाही? मी नाराजच आहे. मी अजित पवार यांच्याशी चर्चा केलेली नाही. मला त्याची गरज वाटली नाही”. लाडकी बहीण आणि ओबीसींमुळे महायुतीला यश मिळाल्याचेही भुजबळ यांनी यावेळी आठवण करून दिली.
छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया येताच, राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. नाशिक, बुलढाणा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी घोषणा देत भुजबळसाहेबांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी घोषणाबाजी केली. भुजबळांचा डावलण्याचा निर्णयाचा निषेध करण्यात आला.
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर इथं छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासच्या भुजबळ समर्थकांनी रस्ता रोको आंदोलन केले. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्याचा निषेध समर्थकांनी केला. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. भुजबळ समर्थकांनी केलेल्या रास्ता रोको केल्याने छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बुलढाणा इथल्या सिंदखेडराजा इथं ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर-पुणे या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयाचा निषेध यावेळी करण्यात आला.
दरम्यान, पक्षाचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घेतील. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यावर प्रतिक्रिया देताना, ते जातीय राजकारणाचा बळी ठरले आहेत. परंतु ही कर्माची फळ आहेत. ते आम्ही पाहत आहोत, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.