नवी मुंबईत ११ नायजेरियन अटक; ७ ठिकाणी १२ कोटींचे ड्रग्ज जप्त ; पहाटेपर्यंत धाडसत्र सुरू

0

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये १२ कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी ११ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत पोलिसांचे हे धाडसत्र शहरभर सुरू होते.

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानुसार यंदाही थर्टी फर्स्टच्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी गुरुवारी रात्री एकाच वेळी परिमंडळ एक व दोनमधील सात ठिकाणी छापे टाकले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

वाशी, कोपर खैरणे, नेरूळ, तळोजा, खारघर परिसरात वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली. त्यात ८ नायजेरियन व्यक्तींकडे एकूण १२ कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्स मिळून आले, तर तीन नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले. या एकूणच कारवाईत ११ नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शहरात आश्रय

दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन व्यक्तींवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर अनेकदा ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे. त्यानंतरदेखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छुपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन