महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. गिरीश महाजनांनी एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना कळवला. गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्याहून त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असतानाच, एक मोठी बातमी समोर आली. देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु असल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे सत्ता स्थापनेबाबत नवा सस्पेन्स निर्माण झालेला बघायला मिळत आहे. या घडामोडी आता कुठपर्यंत जाणार? भाजप एकनाथ शिंदे यांना गृहखातं देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधीच्या आधी मुंबईत आज 3 डिसेंबरला राजकीय घडामोडींना वेग आलेला बघायला मिळत आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे गेल्या चार दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्या बैठका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यात शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीसाठी गेले होते. त्यानंतर ते मुंबईत परतले होते. त्यानंतर ते आपल्या साताऱ्यातील दरेगावात गेले होते.
दिवसभरात काय-काय घडलं?
एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा दरेगावातील मुक्काम वाढला होता. शिंदे सलग दोन दिवस दरेगावात होते. त्यानंतर ते मुंबईत आले. पण प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे ते ठाण्यातील निवासस्थानी आराम करत होते. या सर्व घडामोडींनंतर आज दुपारी एकनाथ शिंदे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी गेले. सर्व चेकअप झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे अवघ्या अर्ध्या तासात वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
या बैठकीनंतर भाजपचे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले. यावेळी गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. वर्षा बंगल्यातील अँटी चेंबरमध्ये शिंदे आणि महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले.