राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी आता समोर येत आहे. महाराष्ट्रात तब्बल १२५ जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट ५५ आणि अजित पवार गट ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर महाविकासआघाडी फक्त ५१ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये एकट्या भाजपला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचे अभिनंदन करतो. मनापासून धन्यवाद देतो. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, हे मी आधीपासून सांगत होतो. मी मतदारांचे अभिनंदन करतो. माझ्या लाडक्या बहिणींचेही आभार मानतो. लाडक्या बहिणींनी मतदान केले. लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केले. त्यासोबतच माझ्या लाडक्या भावांनी मतदान केले. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केले. आम्ही अडीच वर्ष जे काम केले, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मतदारांनी दिली. त्यामुळेच महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. आम्ही अडीच वर्षात जे काम केले, त्याची पोचपावती आम्हाला जनतेने दिली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.