सरवणकरांच्या कोटवरील उलटं धनुष्यबाण पाहून अमित ठाकरेंनी काय केलं पाहा

0
1

मुंबईमधील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे दादर आणि माहीम मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माघार घेण्यास नकार दिल्याने येथील निवडणूक फारच रंजक झाली आहे. सरवणकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंविरुद्ध निवडणूक लढण्याची ठाम भूमिका घेतल्याने महायुतीकडून सुरु असलेले राज ठाकरेंना सहकार्य करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळेच या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आज मतदाच्या दिवशी हे दोन्ही उमेदवार आमने-सामने आल्याचं दिसून आलं.

नेमकं घडलं काय?

सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंनी मतदानाला जाण्यापूर्वी मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्यावेळीच या दोघांची मंदिराच्या आवारात भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन केलं आणि त्यांनतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अमित ठाकरेंनी सदा सरवणकरांची विचारपूस करताना कसे आहात? असं विचारलं असता सरवणकरांनीही हसत हसतच त्यांच्याशी संवाद साधला. सदा सरवणकरांनी परिधान केलेल्या हाफ बाह्यांच्या जॅकेटवर त्यांच्या पक्षाचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण लावलेला. पीनने लावलेलं धनुष्यबाणाचं हे चिन्ह उलटं झालं होतं. ही गोष्ट अमित ठाकरेंनी लगेच हेरली. त्यानंतर अमित ठाकरेंनी सरवणकरांना चिन्ह उलटं झाल्याचं सांगण्याऐवजी स्वत:च्या हाताने सरवणकरांनी आपल्या कोटवर छातीजवळ लावलेलं हे धनुष्यबाणाचं उलटं चिन्ह सरळ केलं. सरवणकरांनीही हसून अमित ठाकरेंच्या या कृतीबद्दल आभार मानले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

सरवणकरांनी देवाकडे काय मागितले?

अमित ठाकरेंनी सिद्धीविनायक मंदिरामधून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपण देवाकडे काहीच मागत नाही, देव जे देतो ते खूप असतं, असं त्यांनी सांगितलं. आपण अनेक महत्त्वाच्या दिवसांना इथे आशीर्वाद घेण्यासाठी येतो. आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे असं अमित ठाकरे म्हणाले. तर सरवणकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं सांगितलं. तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होवोत असंही सरवणकरांनी म्हटलं.

या मतदारसंघात तिसराही उमेदवार

या मतदारसंघामध्ये सरवणकर आणि अमित ठाकरेंबरोबरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंतही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने इथे तिरंगी लढत होताना दिसत आहे. या मतदारसंघातून अमित ठाकरेंना पाठिंबा देत सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची जोरदार चर्चा काही दिवस रंगली होती. याचदरम्यान भेटीगाठी आणि चर्चांचे सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र अखेरपर्यंत सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ते आता तिसऱ्यांदा या भागातून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे