मराठा मतदारांचा ‘फेव्हरेट’ पक्ष कोणता? आकडेवारीमुळं सगळीच गणितं ‘फेल’

0

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मतदान कोणाकडे जाणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या माघारीने महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मराठा-कुणबी समाजाच्या मतदानाचा पॅटर्न पाहिला तर महाविकास आघाडीला मराठा मतांचा फायदा होईल, असे थेट म्हणता येत नाही.

परंपरागत मराठा समाज हा 1995 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या मागे उभा राहिल्याचे दिसून येते. मात्र, 1995 नंतर मराठा समाजाचे मतदान हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये विभागले. त्यामुळे मराठा समाज ठामपणे एक पक्षाच्या मागे राहतो, असे म्हणण्यास वाव नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा वगळता भाजपच्या मराठा मतांमध्ये मोठ्या प्रमाणात कोठेही घसरण झाली नसल्याचेच दिसून येते. मराठावड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्य लक्षणीय आहे. येथे भाजपचे दोन मराठा खासदार निवडून आल्याचे दिसते. तर, मराठवाड्यात भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

जसजशी काँग्रसची मराठा समाजाने साथ सोडली तशीतशी या पक्षाची पिछेहाट होत गेली. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत मराठा समाज हा शिवसेना आणि भाजपच्या पाठीमागे उभा राहिल्याचे चित्र होते. अगदी आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर मराठा कुणबी समाजातून शिवसेना 24 टक्के आणि भाजप 29 टक्के मतदान होत सर्वाधिक पाठींबा मिळाला होता. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रसला मराठा-कुणबी समाजातून सर्वाधिक मतदान होत होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मराठा समाज हा भाजपकडे आकृष्ट झालेला दिसून येते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठा कुणबी समाजातून झालेल्या मतदानाची टक्केवारी ही 14 टक्के होती. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मराठा कुणबी मतदानाची टक्केवारी ही दुप्पटीने वाढली. या निवडणुकीत भाजपला 29 टक्के मतदान झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी पेक्षा मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा या निवडणुकीत भाजपच्या मागे उभा राहिलेला दिसतो. त्यामुळे 2014 आणि 2019 मध्ये भाजपकडून सर्वाधिक मराठा-कुणबी आमदार निवडून आले होते.

उमेदवारामागे मराठा समाज

2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये दिग्गज मराठे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले. भाजपच्या मराठा मतांमध्ये वाढ होण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. सर्वच पक्षांमध्ये मराठा नेते आहेत. ज्या प्रमाणे गुजरातमध्ये पटेल आणि कर्नाटकामध्ये लिंगायत भाजपच्या मागे उभे राहिले आहेत. तसे मराठा मतदार हे एका पक्षाच्या मागे उभे राहिले नाही. पक्षापेक्षा मराठा उमेदवाराच्या मागे उभा राहण्यास ते प्राधान्य देताना दिसून येतात. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतून सहा पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे मराठा मतदानाचे जास्तीत जास्त विभाजन होण्याची शक्यता आहे.

जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार

मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाचा फटका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला. मराठवाड्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील हे भाजपच्या, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेलाही भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महायुतीमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील काही बोलत नाही. त्यामुळे जरांगेच्या भूमिकेचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

काँग्रेसला कमबॅकची संधी

1999 ला काँग्रेसच्या मराठा-कुणबी मतांची टक्केवारी 23 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 28 टक्के होती. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या काँग्रेसच्या मराठा-कुणबी मतांची टक्केवारी अवघी 11 टक्के होती. मराठा मतदारांनी काँग्रेसची सोडलेली साथ ही काँग्रेसच्या पि‍छेहाटीचे मु्ख्य कारण होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 13 खासदार विजयी झाली. त्यांच्या मतांची टक्केवारी विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपेक्षा अधिक आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा फायदा काँग्रेसला झाला तर काँग्रेसला कमबॅक करण्याची संधी आहे.

2019 ला मराठा समाज कोणासोबत होता?

2014 सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र, 2019 मध्ये युती विरुद्ध आघाडी अशी लढत झाले. युतीमध्ये भाजप आणि शिवसेना तर आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठा-कुणबी समाजाचे मतदान हे आघाडीला 35 टक्के तर युतीला 46 टक्के झाल्याचे दिसते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीपेक्षा भाजप-शिवसेना युतीला 11 टक्के अधिक मराठा-कुणबी मतदान होते. तर 19 टक्के मराठा कुणबी मतदान हे छोटे पक्ष, अपक्ष उमेदवार यांच्यात विभागाले होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

भाजपची मदार ओबीसी मतदारांवर

भाजपकडे 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मराठा-कुणबी समाजाची मते इतर राजकीय पक्षांपेक्षा सर्वाधिक आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे भाजपची मराठा समाजातील मतदारांची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने मराठा उमेदवार देत निवडणुकीत फार मोठा फटका बसणार नाही,यासाठी सेफ गेम खेळला आहे. मात्र, भाजपची प्रामुख्याने मदार ही त्यांच्या पारंपरिक ओबीसी मतदारांवर असणार आहे. त्यामुळे संपूर्णपणे मराठा मतांवर अवलंबून न राहाता मराठा-ओबीसी मतांमधून विजयाच्या नजीक जाण्याचा भाजपचा प्लॅन असणार आहे. तसेच मराठा मतदान जर विरोधात गेले तरी ओबीसी मतांचे एकत्रीकरण हे भाजपच्या फायद्याचे ठरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

मराठा-कुणबी समाजातून कोणाला पाठींबा

1995 पासून मराठा-कुणबी समाजाचे मतदान हे काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये विभागलेले आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मराठा कुणबी समाजेच मतदान हे काँग्रेसला 11 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 22 टक्के तर, शिवसेनेला 23 टक्के आणि भाजपला 12 टक्के होते. तेच मतदान 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 11 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 17 टक्के, शिवसेनेला 24 टक्के आणि भाजपला 29 टक्के झाले असल्याचे दिसते.

विधानसभा निवडणूक – मराठा कुणबी आमदार संख्या

2004 140

2009 125

2014 132

2019 137