मुंबई : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं काल मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झालं. त्यानंतर आज (गुरुवार) त्यांच्यावर वरळी येथील स्माशनभूमीत शासकीय इतमामात आणि पारसी धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुंबई पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मशानभूमीत उपस्थिती लावली.






अत्यंसंस्कारापूर्वी एनसीपीआर इथं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन पार पाडलं. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आणि अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर वरळी येथील स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांची गर्दी झाली होती. त्यानंतर स्मशानभूमीत देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘रतन टाटा अमर रहे’ अशा घोषणाही नागरिकांनी दिल्या.
दरम्यान, रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी शिफारस महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडं केली आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रतन टाटांचं भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान मोठं होतं तसंच ते माणूस म्हणूनही मोठे होते त्यामुळं त्यांना खरंतर यापूर्वीच भारतरत्न नं सन्मानित करायला हवं होतं पण आता त्यांना मरणोत्तर का होईना पण देशातील या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मागणी केली आहे.
‘गोवा’ श्वानानंही घेतलं अंत्यदर्शन
यावेळी रतन टाटांच्या खास ‘गोवा’ श्वानाला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं होतं. विशेष म्हणजे दोन कर्मचारी त्याला टॅक्सीतूनच घेऊन आले होते. पोलिसांनी गेटवरच टॅक्सी रोखली, पण माहिती दिल्यानंतर ही टॅक्सी आतमध्ये सोडण्यात आली.











