आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदा विधानसभेला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत. तर ते शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची कसोटी लागणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. लोकसभा निवडणुकीतही बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना मोठी लीड मिळाली. त्यामुळे अजित पवारांनी पर्यायी मतदारसंघाची शोधाशोध करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिरुर-हवेली हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. सेना-भाजप युतीतमध्येही हा मतदारसंघ भाजपकडेच होता. याच विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा सोडल्याचं बोललं जात आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपने शिरुर-हवेली मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत.
एकीकडे पुणे जिल्हा आणि शहरातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सर्व संभाव्य जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. मात्र, शिरुर-हवेलीत मुलाखती नाही. मुलाखती न झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्ष श्रेष्ठींकडूनही भाजप कार्यकर्त्यांना ठोस आश्वासन नाही.
अशोक पवार हे शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार आहेत. अशोक पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत. अजित पवार यांनी शिरुर-हवेलीमधून निवडणूक लढवल्यास विजयी होण्याचा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलं होतं. ‘पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट आव्हान दिलं होतं. अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांच्या आव्हानानंतर अशोक पवारांनी देखील पलटवार केला होता.