आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुणे शहरातील जागांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. नुकतेच पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मेळावा घेत शक्तिप्रदर्शन देखील केलं. तत्पूर्वी माजी आमदार बापू पठारे यांचा पक्ष प्रवेश देखील करण्यात आला. एकीकडे शरद पवार पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू असताना दुसरीकडे मात्र पुण्यात अजित पवार गटात शांतता पाहायला मिळत आहे. आता अजित पवार पुण्यातील हे चक्रव्यूह तोडण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळत आहेत. दादांनी उद्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.






गेले काही दिवसांपासून शरद पवार यांच्या बारामती आणि पुण्यामध्ये जोरदार बैठका सुरू आहेत. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी आणि इच्छुक शरद पवार यांच्या भेटी घेत आहेत. आज देखील पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांनी भेटी घेतल्या. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वीपासून गड राहिलेला आहे. हा गड राखण्यासाठी शरद पवारांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. हे चक्रव्यूह तोडण्यासाठी आणि पक्षातील गळती रोखण्यासाठी अजित पवार देखील सरसावले आहेत उद्या अजित पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.
या मेळाव्याला पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाचे माजी आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना देखील उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद आहे. कोणते मतदारसंघ पक्षाला मिळू शकतात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशी तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शरद पवारांच्या बैठकीनंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजित पवार अधिकारी आणि कार्यकर्त्यांची शाळा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकींच्या माध्यमातून पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वास देणं आणि पश्चिम महाराष्ट्रातील गड राखण्यासाठी अजित पवार प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे.











