मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आहे. ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यावर ते ठाम आहेत. मागच्या पाच दिवसांपासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. तसंच गॅझेटमध्ये नोंदी आहेत असंही ते सांगत आहेत. मात्र ओबीसी आंदोलक आणि उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी गॅझेट दाखवत मराठे हे क्षुद्र नसून क्षत्रिय आहेत मनोज जरांगेंनी गॅझेट वाचलं पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे.






काय म्हटलं आहे मंगेश ससाणे यांनी?
“एखाद्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असेल तर कलम ३४० प्रमाणे स्थापन झालेला राज्य मागासवर्ग आयोग आणि आत्ताची १०२ वी घटना दुरुस्ती तसंच १०५ वी घटना दुरस्ती बघावी लागेल. राज्य मागासवर्गीय आयोगाने आत्ताची परिस्थिती काय? त्याचा सर्व्हे आणि खोलवर अभ्यास करायचा असतो. त्यानंतर सरकारला प्रस्ताव द्यायचा असतो. राज्य सरकार राज्य मागासवर्ग आयोगाला मागे सोडून जरांगेचं ऐकणार आहे का? मनोज जरांगे सांगतील ती जात ओबीसीमध्ये घेणार का? मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या आहेत. आम्ही अभ्यास करुनच हे बोलत आहे. मनोज जरांगेंना माझी विनंती आहे की त्यांना शब्दांचा खेळ करु नये. ओबीसींच्या डोळ्यांत धुळफेक करु नका. आम्हीही अभ्यास करतो, आम्ही उपोषणाला बसलोय म्हणून आम्हाला ज्ञान नाही असं नाही. आम्हाला खोटं ठरवलं तर पुढे कसं जायचं तर पुढे काय करायचं पाहता येईल.” असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.
आमच्या आरक्षणाला नख लावू नका
मंगेश ससाणे पुढे म्हणाले, “मी तुम्हाला गॅझेटच्या नोंदींवरुन हे सगळं सांगतो आहे. आमच्या आरक्षणाला नख लावू नका अन्य़था गंभीर परिणाम होतील. महाराष्ट्रातला तमाम ओबीसी आता खवळला आहे.१२३ गावं, मग मराठा, महसूल नोंदी असं सगळं समोर आणलं आहे. सगळं एकाच समाजाला चाललं आहे. उमेदवार गेल्यानंतर त्याची वंशवाळ जुळवण्याची जबाबदारी महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे. कु., कुणबी असा उल्लेख करायचा आणि दाखले घ्यायचे. आमच्या ओबीसी आरक्षणाचा नाश आम्ही करु देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरुन ओबीसी आरक्षणाचं रक्षण करणार. ओबीसी रस्त्यावर आला आहे, कोर्टात गेला आहे. त्यामुळे सरकारने आमचं ऐकून बोध घ्यावा” असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.
जालन्यातल्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर, घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता
गॅझेटच्या नोंदींबाबत काय म्हणाले मंगेश ससाणे?
“मुंबई गॅझेटमध्ये नोंद आहे कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात ते क्षुद्र म्हणून गणले जातात. त्यांची उत्पत्नी ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असं मानलं जातं. हे ब्रिटिश गॅझेटमध्ये लिहिलं आहे. मराठे क्षुद्र आहेत का? तर नाही मराठे लढवय्ये म्हणजेच क्षत्रिय आहेत. सर्वात महत्त्वाची बाब जरांगे म्हणतात निजामकालीन नोंदींवरुन आरक्षण द्या, हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करतात. यातल्या ३२ क्रमांकाच्या पानावर नोंदी आहेत. त्यात कुणबींची लोकसंख्या ४२ हजार ८४६ लिहिली आहे. ३३ क्रमांक पानावर मराठा असा उल्लेख आहे. ५० हजार ६३७ एवढी संख्या आहे. मराठा आणि कुणबी अशा दोन्ही नोंदी वेगळ्या आहेत. ज्या निजामाच्या भरवशावर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवायचं ठरवत आहेत त्या गॅझेटमध्ये काय उल्लेख आहे बघा.” असं मंगेश ससाणे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे गॅझेट खोटं ठरवणार का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे हे गॅझेट खोटं ठरवणार आहेत का? मनोज जरांगेंच्या अर्धवट ज्ञानातून ओबीसी समाजाचा घात करायचा असेल तर आम्हीही अभ्यासू आहोत. आमच्या अंगावर गॅझेट मारत असाल तर ही सगळी गॅझेट आम्ही तुम्हाला पोस्टाने पाठवतो. असं म्हणत सगळी गॅझेट यावेळी मंगेश ससाणे यांनी सादर केली. मराठा आणि कुणबी समाज वेगळा आहे हे सगळ्या गॅझेटमध्ये आलं आहे. आमचं एक मनोज जरांगेंना सांगणं आहे की तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या तुम्ही कधीही आव्हान द्या आम्ही त्याचं उत्तर देऊ शकतो. महाराष्ट्राच्या समोर आम्ही गॅझेट आणलं आहे. जरांगेंनी गॅझेट वाचावं आणि अज्ञानी तसंच आततायी मागण्या करु नये. ओबीसींच्या ताटामध्ये मीठ कालवू नये. आमच्याकडून हे गॅझेट घेऊन जा.” असंही मंगेश ससाणेंनी म्हटलं आहे.











